शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने दिपावलीनिमित्त समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्हणाले, दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिपावली उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त समाधी मंदिर व परिसरात शनि शिंगनापुर येथील गणेश शेटे, शनेश्वर डेकोरेर्टस यांच्यावतीने विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. तसेच समाधी मंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
दिपावलीनिमित्त दिनांक २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५.०० ते ०५.५५ यावेळेत समाधी मंदिरात श्रीगणेश पूजन, लक्ष्मी-कूबेर पूजन, सरस्वती पूजन, श्रींना धूप-नैवेद्य दाखविणे आदी कार्यक्रम होणार असल्यामुळे सायंकाळी ०४.३० वाजता दर्शनरांग बंद होईल. लक्ष्मी-कूबेर पूजन झाल्यानंतर सायंकाळी ०६.०० वाजता श्रींची धुपारती होवुन सायं.६.४५ वाजता भक्तांसाठी दर्शन रांग सुरु करण्यात येईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल. दिपावली उत्सवानिमित्त संस्थानच्या वतीने सकाळी ७.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत लेंडीबागेजवळील गेट नंबर ५ च्या समोर साईभक्तांना विविध वृक्षांचे रोपे वाटप करण्यात येत असल्याचे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.
तसेच श्री.मुगळीकर यांनी सर्व साईभक्तांना, ग्रामस्थांना व संस्थान कर्मचा-यांना दिपावलीच्या शुभेच्छा ही दिल्या.
------------------------------------------
दिपावली निमित्त सर्व पत्रकार बंधुंना शुभेच्छा. ही दिपावली आपणास व आपल्या परिवारास आनंदाची, सुख-समृध्दीची व भरभराटीची जावो ही साईचरणी प्रार्थना.