Download App

सामुदायिक स्‍तवन मंजरी पठण कार्यक्रमाचे आयोजन

सामुदायिक स्‍तवन मंजरी पठण कार्यक्रमाचे आयोजन

Undefined

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने श्री साईनाथ स्‍तवनमंजरीचे रचनेस १०० वर्षे पुर्तीनिमित्‍त गुरुवार दिनांक १३ सप्‍टेंबर २०१८ रोजी सकाळी ९ ते ११ यावेळेत हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपामध्‍ये सामुदायिक स्‍तवन मंजरी पठण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

श्रीमती अग्रवाल म्‍हणाल्‍या, श्रीसाईनाथ स्‍तवनमंजरी ही श्री साईबाबांच्‍या हयातीत संत दासगणू महाराज यांनी दिनांक ०९ सप्‍टेंबर १९१८ रोजी नर्मदेच्‍या काठी अहिल्‍यादेवींची समाधी असलेल्‍या महेश्‍वर येथे लिहून पुर्ण केली. या दिवशी सोमवार भाद्रपद, शुध्‍द गणेश चतुर्थी होती. या स्‍तवन मंजरीला चार अध्‍यायांचा पाया आहे. श्री साईबाबांच्‍या निर्वाणानंतर श्री साई स्‍तवनमंजरीची दैनंदिन पारायणे सुरु झाली. या स्‍तवन मंजिरीमध्‍ये १६३ ओव्‍या असून मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी, कन्‍नड, पंजाबी, तेलगू, बंगाली व जर्मन अशा ९ भाष्‍यांमध्‍ये भाषांतरीत करुन संस्‍थानच्‍या वतीने प्रकाशित करण्‍यात आलेली आहे.

अशा या ह.भ.प.श्रीदासगणूकृत श्री साईनाथ स्‍तवनमंजरीचे रचनेस श्री गणेश चतुर्थीला १०० वर्ष पुर्ण होत असून या शतक महोत्‍सवानिमित्‍त गुरुवार दिनांक १३ सप्‍टेंबर २०१८ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० यावेळेत हनुमान मंदिराच्‍याशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे सामुदायिक स्‍तवन मंजरी पठण कार्यक्रम आयोजित करण्‍यात आलेला असल्‍याचे सांगुन जास्‍तीत जास्‍त ग्रामस्‍थांनी व साईभक्‍तांनी या कार्यक्रमात सहभागी व्‍हावे, असे आवाहन ही श्रीमती अग्रवाल यांनी केले.

News Date: 
Wednesday, September 12, 2018