Download App

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव बातमी व निमंत्रण पत्रिका

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव बातमी व निमंत्रण पत्रिका

Undefined

शिर्डीः-

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने बुधवार दिनांक १७ ऑक्‍टोबर २०१८ ते शुक्रवार दिनांक १९ ऑक्‍टोबर २०१८ या काळात १०० वा पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार असून साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्‍याचे सांगुन साईभक्‍तांनी या उत्‍सवात मोठ्या संख्‍येने सहभागी होवून उत्‍सवाची शोभा वाढवावी असे आवाहनही संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी केले.

श्रीमती अग्रवाल म्‍हणाल्‍या, साईबाबांनी ९९ वर्षांपुर्वी दस-याच्‍या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्‍या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्‍यतिथी साजरी करण्‍यात आली. त्‍यानंतर आजतागायत हा पुण्‍यतिथी उत्‍सव नव्‍या उत्‍साहात साजरा केला जात आहे. ज्‍यामुळे विजयादशमी म्‍हणजे श्री साईबाबांची पुण्‍यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्‍त हा उत्‍सव साजरा करतात. श्री साईबाबांच्‍या समाधीस १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी शंभर वर्ष पुर्ण होत आहे. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने समाधीचा शताब्‍दी सोहळा दिनांक ०१ ऑक्‍टोंबर २०१७ ते दिनांक १८ ऑक्‍टोंबर २०१८ या कालावधीत साजरा करण्‍यात येत असून हा शताब्‍दी सोहळा भव्‍य स्‍वरुपात साजरा व्‍हावा या उद्देशाने वर्षभर धार्मिक, सांस्‍कृतिक, सामाजिक व प्रबोधनात्‍मक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येत आहे. त्‍यानुसार दिनांक १८ ऑक्‍टोबर २०१८ रोजी १०० वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सव साजरा करण्‍यात येत असून उत्‍सवानिमित्‍त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे.

उत्‍सवाचे प्रथम दिवशी बुधवार दिनांक १७ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ५.१५ वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.३० ते १०.१५ यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्‍सवाचा हा पहिला दिवस असल्‍यामुळे अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.

गुरुवार, दिनांक १८ ऑक्‍टोबर हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती व श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होवून सकाळी १०.३० वाजता आराधना विधी व दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.३० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. उत्‍सवाचा हा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तर रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींचे समोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.

हा उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल व सर्व विश्‍वस्‍त यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम आणि मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहेत.

News Date: 
Tuesday, October 9, 2018