Languages

   Download App

वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती साईभक्‍तांना ११ हजार विविध वृक्षांची रोपे मोफत वाटप करण्‍यात आले

वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती साईभक्‍तांना ११ हजार विविध वृक्षांची रोपे मोफत

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन तसेच वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी शिर्डीत श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या साईभक्‍तांना आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे मोफत वाटप करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी तसेच शिर्डीत आलेल्‍या साईभक्‍तांना सावली मिळावी व वातावरणात प्रसन्‍नता राहावी याकरिता संस्‍थान परिसरामध्‍ये १००० वृक्षांची लागवड करणेत आलेली आहे. या वृक्षलागवडीमुळे प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. दिनांक २६ जुलै २०१९ रोजी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १००० निंबवृक्षाची रोपे वाटप करणेत आलेली आहेत. त्‍याचप्रमाणे मंगळवार दिनांक १७ सप्‍टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १५०० निंबवृक्षांची रोपे वाटप करण्‍यात आलेली आहेत.

या उपक्रमाचा एक भाग म्‍हणूनच श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०१९ पासून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी येणा-या साईभक्‍तांना समाधी मंदीर परिसरात (लेंडीबाग गेट क्रं. ५ जवळ) प्रसाद रुपाने नियमित मोफत रोपे वाटप करणेत येत आहेत जेणेकरुन साईभक्‍त आपल्‍या घरी या रोपांची लागवड करतील. याची माहिती साईभक्‍तांना होणेकरीता मंदीर परिसरात वेगवेगळया भाषेत फलक ही लावण्‍यात आलेले आहेत. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार होण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध राज्‍यांतुन येणा-या साईसेवकांना वृक्ष वाटपाच्‍या सेवेचा लाभ दिला जात आहे. सदर मोफत वृक्ष वाटप उपक्रमामध्‍ये अशोका, शिसम, वड, आवळा, चिंच, जांभूळ, निंब अशा विविध प्रकारच्‍या रोपांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.

या मोफत वृक्ष वाटप उपक्रमामधुन आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे साईभक्‍तांना मोफत वाटप करण्‍यात आलेले असून यापुढेही मोफत वृक्ष वाटप उपक्रम सातत्‍याने राबविला जाणार असल्‍याचेही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

Undefined
Saturday, January 4, 2020 (All day)