Download App

News

News

रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षीत करण्‍याची सुविधा सुरु

January 25th, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने रेल्‍वेने प्रवास करुन शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता येणा-या साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षीत करण्‍याची सुविधा शनिवार दिनांक २६ जानेवारी २०१९ पासून सुरु करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.

केंद्रीय रेल्‍वे मंत्री पियुष गोयल हे शिर्डी येथे श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आले असता संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी साईभक्‍तांना ई-रेल्‍वे तिकीट आरक्षणाबरोबरच दर्शन पासेस आरक्षीत करण्‍याची सुविधा सुरु करण्‍याची मागणी केली होती. श्री.गोयल यांनी ही मागणी तात्‍काळ मान्‍य करुन या संदर्भात IRCTC ला आदेश दिले होते. त्‍यानुसार आता रेल्वेने प्रवास करणा-या साईभक्तांना ई-रेल्वे तिकीट आरक्षण करतेवेळेसच श्री साईंच्या दर्शनाचे पासेस आरक्षीत करण्याची सुविधा ई-रेल्‍वे तिकीट बुकींग (IRCTC च्‍या) वेबसाईटवरुन संस्थानचे ऑनलाईन सर्व्हिसेस (online.sai.org.in) या वेबसाईटद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे साईभक्तांच्या वेळेची बचत होऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन तात्‍काळ होणार आहे. सदरची सुविधा ही शनिवार दिनांक २६ जानेवारी २०१९ पासून सुरु करण्‍यात येणार असून ही सुविधा साईनगर-शिर्डी, कोपरगांव, नगरसूल, मनमाड व नाशिक या स्टेशनचे ई-रेल्वे तिकीट आरक्षीत करणा-या साईभक्तांसाठी उपलब्‍ध असणार आहे.

श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डी साईनगर रेल्‍वे स्‍टेशनवर आठवडाभरात सुमारे ६० गाड्या ये-जा करत असून हावडा, पुरी, चेन्‍नई, म्हैसूर, विशाखापट्टण्‍म, सिकंदराबाद, तिरुपती, काकीनाडा, दिल्‍ली व मुंबई आदी ठिकाणाहुन गाड्या येतात. यासर्व रेल्‍वे गाड्यांनी प्रवास करणा-या लाखो साईभक्‍तांना या सुविधेचा लाभ मिळणार असल्‍याचे ही डॉ.हावरे यांनी सांगितले.

Recent News