Download App

News

News

श्री साईबाबा पुण्यतिथी उत्‍सव मुख्‍य दिवस

October 18th, 2018

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०० वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्‍यामुळे लाखो साईभक्‍तांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर यांनी प्रतिमा, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी, विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांनी विणा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिता शेळके, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने उपस्थित होते. तर सकाळी अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांच्‍या सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपुजा व आराधना विधी करण्‍यात आली.

सकाळी ९ वाजता शिर्डी शहरातून काढण्‍यात आलेल्‍या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, खासदार सदाशिव लोखंडे, विश्‍वस्‍त सर्वश्री बिपीनदादा कोल्‍हे, भाऊसाहेब वाकचौरे, मोहन जयकर, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. तसेच सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्‍यायाधिश श्री.उदय ललित व राज्‍याचे गृह (ग्रामीण) वित्त व नियोजन राज्‍यमंत्री श्री.दिपक केसरकर यांनी पहाटे श्रींची काकड आरती, श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची आणि श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व भिक्षा झोळी कार्यक्रमास हजेरी लावली.

सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.विवेक गोखले, नृसिंहवाडी यांचे किर्तन झाले. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन करण्‍यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. तर रात्रौ ७.३० ते १०.३० यावेळेत श्री.महेश काळे, मुंबई व श्री.राहूल देशपांडे, मुंबई यांच्‍या भजन संध्‍या कार्यक्रमास श्रोत्‍यांनी भरभरुन दाद दिली. रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्‍यात आली. या रथ मिरवणूकीत स्‍थानिक भजनी मंडळ, झांज पथक, लेझीम पथक, बॅन्‍ड पथक, तसेच ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने सहभागी झाली होते.

उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी शुक्रवार, दिनांक १९ ऑक्टोबर उत्‍सवाच्‍या तृतिय दिवशी सकाळी ५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.३० ते १०.१५ यावेळेत सुप्रसिध्‍द गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.

Recent News