Download App

News

News

श्री पुण्‍यतिथी उत्सवाची तयारी पुर्ण

October 15th, 2018

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०० वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व ब्रम्‍हांडनायक हा भव्‍य देखावा प्रवेशव्‍दारावर उभारण्‍यात आला आहे. तसेच उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.

श्रीमती अग्रवाल म्‍हणाल्‍या, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्‍त आहेत. हे साईभक्‍त श्री पुण्‍यतिथी सोहळ्यानिमित्‍त आपल्‍या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्‍याकरीता शिर्डीला येतात. यावर्षी श्रीपुण्‍यतिथी उत्‍सवात श्री साईबाबांच्‍या समाधीस १०० वर्ष पुर्ण होत असल्‍याने या उत्‍सवाचे अनन्‍य साधाराण महत्‍व आहे. त्‍यामुळे श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, साई उद्यान परिसर, मोबाईल लॉकर परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शनरांग व फुटपाथ, नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ६६ हजार ५०० चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईनगर मैदान, सर्व्‍हे नं.०१ त्रिकोणी जागा, शासकीय विश्रामगृह व श्री साईप्रसादालयाच्‍या पश्चिमेस ५५ हजार ५०० चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे.

तसेच नगर-मनमाड रोड सौमय्या शाळेच्‍या मागे सौमय्या गोदावरी शुगर मिल्‍स प्रा.लि. लक्ष्‍मीवाडी, गोदावरी वसाहत उत्‍तरेस श्री साईप्रसाद प्रॉपर्टीज साकुरी, कनकुरी रोड पाण्‍याच्‍या टाकी जवळील शेती महामंडळाच्‍या जागेत, नगर-मनमाड रोडच्‍या पुर्व बाजूस कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे उत्‍तरेस श्रीमती कुंदला यांच्‍या जागेत, साईनगर परिसराचे दक्षिणेस रिंग रोड लगत, साईनगर रेल्‍वे स्‍टेशनकडे जाणा-या रस्‍त्‍यालगत श्री विजय पारख यांच्‍या जागेत, आर.बी.एल.बॅंकेशेजारी १८ मीटर रस्‍त्‍यालगत श्री.बागरेचा यांच्‍या जागेत, १८ मीटर रस्‍ता व चारी नं.१२ रोड लगत (मध्‍यवर्ती भांडार जवळ) श्री.विजय पारख यांच्‍या जागेत, साईआश्रम भक्‍तनिवास शेजारील २४ मीटर रस्‍त्‍यालगत डॉ.एनाकथ गोंदकर यांच्‍या जागेत, नगर-मनमाड रोड हॉटेल इंटरनॅशनल व हॉटेल मथुरा यांचे मधील श्री.ज्ञानेश्‍वर शेळके यांच्‍या जागेत व श्रीराम पार्कींग श्री.नितीन कोते यांच्‍या जागेत पार्कींग व अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी आणि नवीन पिंपळवाडी रस्‍त्‍यालगत सुमारे ५५ हजार चौरस फुटाचे मंडप टाकण्‍यात आलेले आहे. तसेच पावसाची शक्‍यता लक्षात घेवून मंडपावर प्‍लॅस्टिक ताडपत्री टाकण्‍यात आलेली आहे. तसेच शिर्डी व शिर्डी परिसरातील ७ मंगलकार्यालये अतिरिक्‍त निवास व्‍यवस्‍थेसाठी उपलब्‍ध ठेवण्‍यात आलेले आहे. यासर्व ठिकाणी विद्युत, सुरक्षा, स्‍वच्‍छता, पिण्‍याचे पाणी, चहा, कॉफी, दुध, नाष्‍टा, श्रींच्‍या दर्शनासाठी येणे-जाणेकरीता बसेसची व्‍यवस्‍था व वैद्यकीय उपचारासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्‍यात आलेले आहे.

उत्‍सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असून उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी बुधवार दिनांक १७ ऑक्‍टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता ह.भ.प.श्री. विवेक गोखले, नृसिंहवाडी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ.७.३० ते १०.३० यावेळेत श्री.प्रसाद कांबळी, मुंबई प्रस्‍तुत देवबाभळी हा नाटकचा कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी गुरूवार दिनांक १८ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.विवेक गोखले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व रात्रौ.७.३० ते १०.३० यावेळेत श्री.महेश काळे, मुंबई व श्री.राहूल देशपांडे, मुंबई यांचा भजन संध्‍या हा कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवाच्‍या सांगता दिनी शुक्रवार दिनांक १९ ऑक्‍टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.विवेक गोखले यांचा काल्‍याचे कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत सुप्रसिध्‍द गायिका श्रीमती अनुराधा पौडवाल, मुंबई यांचा भजन संध्‍या कार्यक्रम होणार आहे. उत्‍सवकाळात कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्‍टेजवर आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे.

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, व्‍दारकामाई, चावडी व गुरुस्‍थान या ठिकाणी हैद्राबाद येथील दानशुर साईभक्‍त‍ श्रीमती विजया नायडू यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. तसेच मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व प्रवेशव्‍दारावर ब्रम्‍हांडनायक हा भव्‍य देखावा उभारण्‍यात आला आहे. उत्‍सवात साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून साईभक्‍तांकरीता १५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू व १३० क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. उत्‍सव काळात भक्‍तांच्‍या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, नविन भक्‍तनिवासस्‍थान, साईआश्रम व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे.

याबरोबरच दिनांक १७ ऑक्‍टोबर रोजी होणा-या अखंड पारायणात भाग घेवू इच्छिणा-या साईभक्‍तांनी आपली नावे दिनांक १६ ऑक्‍टोबर रोजी दुपारी १.०० ते ५.३० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर नोंदवावीत. त्‍यांच दिवशी सायं.५.३० वाजता सोडत पध्‍दतीने भाविकांची निवड करण्‍यात येईल. भिक्षा झोळी कार्यक्रमात भाग घेवू इच्छितात त्‍यांनी आपली नावे दिनांक १७ ऑक्‍टोबर रोजी सकाळी ८.०० ते ११.३० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर नोंदवावीत. त्‍यांच दिवशी त्‍यांच ठिकाणी दुपारी १.३० वाजता सोडत पध्‍दतीने भाग्‍यवान भक्‍तांची निवड करण्‍यात येईल. तसेच उत्‍सवाच्‍या मुख्‍यदिवशी १८ ऑक्‍टोबर रोजी रात्रौ ११ ते ५ यावेळेत होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्‍ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत असे ही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.

हा उत्‍सव यशस्‍वरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम, सर्व विश्‍वस्‍त यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम व मनोज घोडे पाटील, उपकार्यकारी अधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.

Recent News