Languages

   Download App

श्रीरामनवमी उत्सव पूर्वपिठीका

श्रीरामनवमी उत्सव पूर्वपिठीका

अशी सुरु झाली... शिर्डीची श्रीरामनवमी

             श्री साईबाबा संस्थान दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतं. तीन मुख्य उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या उत्सवाला शतकाची परंपरा असून साक्षात साईबाबांच्या आज्ञेने हा उत्सव सुरु झाला आहे. त्यामुळे त्यास अनन्यसाधारण महत्व आहे. श्री साईबाबा संस्थान एखाद्या मोठ्या सणासारखा हा उत्सव साजरा करतं.

           या वर्षी मंगळवार दिनांक १६ एप्रिल ते गुरूवार दिनांक १८ एप्रिल २०२४ या कालावधीत हा उत्सव साजरा होतो आहे. त्या निमित्ताने या उत्सवाची पूर्वपिठीका.

ही सुमारे शतकापुर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी कोपरगावला गोपाळराव गुंड म्हणून एक शासकीय अधिकारी होते. त्यांना संतान नव्हते. पुढे साईबाबांच्या प्रसादाने त्यांना पुत्ररत्न झाले. ते बाबांचे निस्सिम भक्त बनले. एकदा गोपाळरावांच्या मनात आले की, शिरडी गावात दरवर्षी एखादी यात्रा किंवा उरुस भरवावा. तात्या पाटील कोते, रामचंद्र दादा कोते व माधवराव देशपांडे वगैरे गावातल्या मुख्य मंडळींना त्यांचा हा विचार आवडला व ते तयारीलाही लागले. पण त्या करीता जिल्हाधिका-यांची अनुमती घेणे गरजेचे होते. परंतु काही व्यक्तींचा विरोधामुळे  जिल्हाधिका-यांनी यात्रा भरवू नये असा हुकूम दिला. मात्र यात्रा भरावी असे बाबांच्या मनात होते. तशी आशीर्वादयुक्त त्यांची अनुमतीही होती. त्यामुळे गांवक-यांनीही पिच्छा पुरविला. जिवापाड प्रयत्न केला आणि आधिका-यांनी हुकूम फिरवून सगळयांचा मान राखला. तेव्हापासुन (शके १८१९, सन १८९७ ) बाबांच्या संमतीने श्रीरामनवमीच्या दिवशी यात्रेच्या प्रथेला आरंभ झाला. तात्या पाटील कोते यात्रेची व्यवस्था पाहु लागले. श्रीरामनवमीच्या दिवशी भजन-पूजनाच्या समारंभासह, ताशे-चौघडे वाजंत्र्यांसह यात्रेची शोभा वाढू लागली. दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने दोन नवी निशाणे समारंभपूर्व मिरवत आणून मशिदीच्या (व्दारकामाईच्या) कळसाला बांधली जाऊ लागली. यात एक नानासाहेब निमोणकरांचे व दुसरे नगर येथील दामूशेठ कासार (रासने) (ज्यांना बाबांच्या कृपेने पुत्ररत्न झाले होते.) यांचे होते. या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ठ असं की हिंदू-मुस्लीम ऐक्य सांगणारी संदलची मिरवणूक या उत्सवात निघते. बाबांचे भक्त अब्दुलबाबांच्या झोपडी पासून या मिरवणूकीला आरंभ होतो. या मिरवणूकीत सर्व धर्माचे साईभक्त भाग घेतात.

रामनवमी – मूळ कल्पना भीष्मांची ...

            शके १८३३ (सन १९११) साली श्रीरामनवमी प्रथम उरुसापोटी जन्माला आली आणि तेव्हापासून ही प्रथा अखंड चालू आहे. तोपर्यंत केवळ उरुसच मोठ्या प्रमाणात भरत असे. रामनवमीची मूळ कल्पना प्रसिध्द साईभक्त कृष्ण जागेश्वर भीष्म यांची एकदा भीष्म वाड्यात स्वस्थचित्ताने बसले असता काका महाजनी पूजा साहित्यासह मशिदीत जायला निघाले होते. उरुसात सहभागी होण्यासाठी काका उत्सवासाठी एक दिवस आधीच शिरडीत हजर झाले होते. भिष्मांनी त्यांना विचारले, “माझ्या मनात एक चांगला विचार आहे. मला मदत कराल का? येथे दरवर्षी उरुस भरतो. तो रामजन्माचाच दिवस असतो. तेव्हा रामजन्मोत्सव संपादयाची संधी अनायसेच आली आहे.” काका महाजनींना हा विचार आवडला ते म्हणाले, “घ्या बाबांचा  होकार. त्यांच्या आज्ञेवर सर्व काही आहे. कामाला लागायला मला उशीर नाही. परंतु उत्सवाला कीर्तनाची जरुरी असते. खेडेगावी हरदास (कीर्तनकार) कुठे सापडायचा?” भीष्म म्हणाले, “मी कीर्तन करीन, तुम्ही पेटीचा सूर धरा. राधाकृष्णामाई वेळेवर सुंठवडा तयार करतील. चला मग बाबां कडे, शुभ कार्याला विलंब लावल की काहीतरी अडचण उभी राहते. शुभ कार्याला शिघ्रत्वाची जोड दिली की ते हातोहात साधले जाते. चला आता” असे बोलून ते दोघे लगेच मशिदीत गेले. त्यांनी पूजेला आरंभ करताच बाबांनी विचारलं, “वाड्यात काय चालले होते?” पण काकांना सांगणे सुचले नाही. तेव्हा लगेच बाबांनी तोच प्रश्न दुस-या त-हेने भिष्मांना विचारला का हो! बुवा काय म्हणत होते?” तेंव्हा काकांना आठवण झाली आणि त्यांनी मनात योजलेला हेतू सांगितला. बाबांच्या मनाला तो विचार आवडला आणि उत्सव करण्याचे निश्चित झाले.

 

 

बाबांनी हार नव्हे अनुमती दिली.

दुस-या दिवशी सकाळी बाबा लेंडीला गेलेले पाहून सभामंडपात पाळणा बांधला आणि रामजन्माचं कीर्तन उभं राहिल. श्रोतेही वेळेवर जमले त्याचवेळी बाबा परतले. काका पेटीच्या साथीला बसले. इतक्यात बाबांनी त्यांना बोलविणे पाठविले. बाबा तुम्हाला बोलावित आहेत. हे शब्द ऐकताच काकांच्या पोटात धस्स झाले. मनात म्हणाले, “काय झाले कळत नाही. कथेचा विरस न होवो कीर्तन निर्विघ्न पार पडले म्हणजे झाले!” काका पुढे चालत आणि मागे पाहत भीत भीत मशिदिच्या पाय-या चढू लागले. काका फार चिंताग्रस्त झाले होते. बाबा त्यांना विचारू लागले, “हा पाळणा येथे कशासाठी बांधला आहे?’’ काकांनी कथेचे तात्पर्य व उत्सवाची योजना सांगितली आणि ती ऐकून बाबांना आनंद झाला. मग  बाबांनी तेथे जवळच असलेल्या निंबरातुन (कोनाडयातून) एक सुंदर हार घेवून काकांच्या गळयात घातला आणि एक भिष्मां करीताही दिला. पाळण्याचा प्रश्न विचारल्यावर मोठी काळजी उत्पन्न झाली होती. परंतु हार गळयात पडल्यावर सर्वांची काळजी दूर झाली.

आधीच भीष्म बहुश्रुत आणि विविध विदया पारंगत असल्याने कीर्तन रसभरीत झाले. बाबांच्या चेह-यावरील प्रसन्नता बघून व हेच अनुमोदन समजून कीर्तन भजनासह उत्सव आनंदात पार पडला. रामजन्माच्या वेळी बाबांच्या डोळयात गुलाल पडला आणि कौसल्येच्या मंदिरात श्रीरामाऐवजी जणु काय बाबाच नरसिंहरूपाने प्रकटले. गुलालाचे केवळ निमित्त होते. रामजन्माचा तो आवेश होता. बाबांना एकाऐकी क्रोध आला. शिव्याशाप सुरू झाले. राधाकृष्णामाई पाळण्याचे तुकडे होतील म्हणून गडबडून गेल्या. तो कसा सुरक्षित राहील त्याचे त्यांना साकडे पडले. “सोडा, सोडा, लवकर सोडा” असा त्यांचा लकडा लागल्यामुळे काका तो पाळणा सोडयाला पुढे सरकले. तो बाबा अत्यंत खवळले आणि काकांच्या अंगावर धावून गेले. मग पाळणा सोडणे जागीच राहीले आणि बाबा देखील शांत झाले. पुढे दुपारी आज्ञा मागितली असता बाबा आश्चर्याने म्हणाले आताच पाळणा कसा सोडता? अजून त्याची आवश्यकता आहे की! साईबाबांचे शब्द चुकीचे किंवा उगाच कारणाशिवाय नसणार विचार केल्यावर लक्षात आले की उत्सवाची सांगता झालेली नव्हती येथपर्यंत उत्सव झाला परंतु जोपर्यंत दुसरा दिवस उगवत नाही गोपालकाला होत नाही तोपर्यंत उत्सव यथास्थित पुर्ण झाला असे म्हणू नये. अशा प्रकारे दुस-या दिवशी गोपालकाला व कीर्तन झाल्यानंतर पाळणा सोडण्याची आज्ञा बाबांनी दिली.

दासगणूंकडे कायमची कीर्तनवृत्ती

            पुढील साली भीष्म नव्हते. त्यामुळे बाळाबुवा सातारकरांना कीर्तनासाठी आणायचे होते. परंतु त्यांना सांगली जिल्ह्यातील कौठे येथे रामनवमी उत्सवाची वर्षासन (वार्षीक नेमणूक) असल्याने तेथे जाणे आवश्यक होते म्हणून काका महाजनीं बाळाबुवा नावाच्याच एका भक्तीभाव असलेल्या व्यक्तीला (ज्यांची “अर्वाचीन तुका” म्हणून प्रसिध्दी होती.) घेवून आले व उत्सव साजरा करविला. ते ही मिळाले नसते तर काका महाजनीच कीर्तनाला उभे राहणार होते. दासगणूंचे रामनवमीचे आख्यान त्यांना पाठ होतेच. परंतु तिस-या वर्षी बाळाबुवा सातारकरांचे शिर्डीला येणे झाले ती गोष्ट मोठी मनोरंजक आहे. बाळाबुवा स्वतः हरदास होते. सांगली जिल्ह्यात बि-हाड सिध्द कौठे नावाचे देवस्थान आहे. तेथील रामनवमीच्या कीर्तनाची बाळाबुवांना वार्षीक नेमणूक होती. आषाढी एकादशी व रामनवमी या दोन वार्षिक उत्सवांशी बाळाबुवांचा संबंध होता. या दोन उत्सवासाठी बाळाबुवांना ३० रुपये बिदागी मिळत असे. परंतु त्यावर्षी कौठे गावात महामारीची साथ आली आणि   गावक-यांवर कठीण परिस्थिती येवून ठेपली. रामनवमी राहीली आणि तेथून बुवांना पत्र आले की, आता पुढच्या वर्षी यावे. गावच रिकामा झाला आहे. सारांश रामाची सेवा चुकली. बिदागीही जागच्या जागी राहीली. आणि शिरडीला जाण्याची संधी मिळाली.

            बाळाबुवांनी दीक्षीतांची भेट घेतली. दीक्षीत बाबांचे परमभक्त आहेत. त्यांनी मनात आणले तर आपले शिरडीला जाण्याचे मनोगत पूर्ण होईल आणि स्वार्थ व परमार्थ दोन्ही साधतील असा विचार करुन ते दीक्षीतांना म्हणाले, “यंदा आमचे वर्षासन राहीले. तेव्हा बाबांचे दर्शन घ्यावे आणि तेथेच कीर्तन करावे असे वाटते.” त्यावर दीक्षीत म्हणाले, “बिदागीबद्दल खात्री नाही. देणे न देणे बाबांच्या हाती असते. कीर्तनासाठी देखील त्यांचीच संमती लागेल.” त्यांचं हे बोलणं चाललं असतानाच काका महाजनी अवचित आले. त्यावेळी ते शिर्डीहुनच आले होते. सर्वांना त्यांनी शिरडीचा प्रसाद व उदी दिली व ते घरी गेले. बाळाबुवांना हा शुभशकूनच वाटला. पुढे दीक्षीत बाळाबुवांना मोठ्या प्रेमाने म्हणाले, “मी बाबांची संमती विचारतो व ती मिळाल्यावर तुम्हाला नक्की कळविन. पत्र येताच शिरडीला यावे.” पुढे बाबांच्या अनुमोदनानंतर बाळाबुवा शिरडीला आले. त्यांना इच्छिल्याप्रमाणे बाबांचे दर्शन घडले. साईबाबांनी देखील रामनवमी उत्सव सोहळा आपल्यासमोर बाळाबुवांच्या  हस्ते मोठ्या प्रेमाने व कौतुकाने करुन घेतला. बाळाबुवांना १५० रुपये बिदागी देण्यास बाबांनी परवानगी दिली. पाच वर्षाची कवठ्याची प्राप्ती एकाच उत्सवात झाल्याने बाळाबुवा खुश झाले. सन १९१३ नंतर एके दिवशी दासगणू शिरडीत आले असता दीक्षीतांनी बाबांना विनंती करुन दरवर्षीचा उत्सव त्यांना कायमचा ठरवून दिला. तेंव्हापासून आजपर्यंत हा उत्सव साईनामाच्या जयघोषाने, विविध कार्यक्रमांनी आणि दासगणूच्या परंपरेतल्या कीर्तनांनी साजरा होतो.

            दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने देशाच्या कानाकोप-यातून सुमारे २५० ते ३०० पालख्या घेवून हजारो पदयात्री साईभक्त साईनामाच्या गजरात शिर्डीस हजेरी लावतात. श्री साईबाबा संस्थान आयोजित श्रीरामनवमी, श्रीगुरुपौर्णिमा व श्रीपुण्यतिथी या तीन उत्सवाच्या व्यतिरिक्त संपूर्ण वर्षभर साईभक्त साईबाबांच्या या पालखीत श्री साईंची प्रतिमा घेऊन मजल दर मजल करीत शिर्डीला पोहचतात. पहिल्या पालखीचा मान साईभक्त श्री.बाबासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली १९८१ साली सुरु होऊन साईनिकेतन दादर, मुंबई या ठिकाणाहून ४३ भक्तांसह शिर्डीला निघालेल्या “साईसेवक मंडळाच्या” पालखीचा आहे. एकटया मुंबई व उपनगरातून दरवर्षी श्रीरामनवमी उत्सवाला सुमारे १०० ते १५० पालख्या शिर्डीस येत असून वर्षभरात सुमारे ५०० पालख्या शिर्डीस येतात. याशिवाय गेली ३५ वर्षापासून प्रत्येक गुरुपौर्णिमा उत्सवाला श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे ही पालखी शिर्डीस येत आहे. संपूर्ण वर्षभर महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदि राज्यामधुन मोठयासंख्येने पालख्या शिर्डीत  येतात. अशाप्रकारे गेल्या काही वर्षापासून साईंची पालखी घेवून येणारे साईभक्त पदयात्री हे या श्रीरामनवमी उत्सवाचे आकर्षण ठरत आहे.            

            या वर्षीचा श्री रामनवमी उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे. 

Undefined
  श्री साईबाबा संस्थान दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा करतं. तीन मुख्य उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. हा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. या उत्सवाला शतकाची परंपरा असून साक्षात साईबाबांच्या आज्ञेने हा उत्सव सुरु झाला आहे. त्यामुळे त्यास अनन्यसाधारण महत्व आहे
Monday, April 8, 2024 - 16:30