श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच दुर्बीण (एंडोस्कोप) व्दारे मेंदूतील रक्ताची गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली
शिर्डी (दि. 20 ऑक्टोबर 2025) — श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटलमधील न्युरो सर्जरी विभागात प्रथमच अत्याधुनिक दुर्बीण (एंडोस्कोप) तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाच्या मेंदूमधील रक्ताची गाठ यशस्वीपणे काढण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया पूर्णतः यशस्वी ठरली असून रुग्ण सध्या पूर्णपणे ठणठणीत आहे.
या अभिनव शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला वेंटिलेटरवरून अल्पावधीतच बाहेर आणण्यात आले आहे. साधारणपणे अशा प्रकारच्या मेंदूच्या टाक्याच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना ७ ते १० दिवस वेंटिलेटरवर राहावे लागते, मात्र एंडोस्कोपच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या या पद्धतीमुळे रुग्णांना तत्काळ आराम मिळतो.
सविस्तर माहिती अशी की, रुग्ण किसन आनंदा पवार (वय ५५, रा. हताणी, ता. उंबरी, जि. नांदेड) हे मेंदूतील रक्तस्रावामुळे उपचारासाठी श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. डॉ. संतोष उणवणे (न्युरो सर्जन) यांनी आवश्यक तपासणीनंतर मेंदूमध्ये रक्ताची गाठ असल्याचे निदान केले. त्यांनी रुग्ण व नातेवाईकांना शस्त्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देत एंडोस्कोपद्वारे गाठ काढण्याचा सल्ला दिला. संमती मिळाल्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली आणि रुग्ण आता पूर्णपणे बरा आहे.
या शस्त्रक्रियेच्या यशात डॉ. संतोष उणवणे, (न्युरो सर्जन), डॉ. निहार जोशी, भुलतज्ञ तसेच संपूर्ण न्युरो विभागाच्या टीमचे विशेष प्रयत्न लाभले आहेत. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली असून, अशाच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये शासनाच्या योजनेद्वारे मोफत केल्या जातात. गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष उणवणे यांनी केले आहे.
या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से), उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक (से.नि), उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे आदींनी न्युरो ओटी टीमचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.