शिर्डी – निसर्ग संवर्धन आणि भक्ती यांचे सुंदर समन्वय साधत शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेमार्फत “वृक्ष प्रसाद योजना” दि. १० जुलै २०२५ पासून औपचारिकपणे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इच्छुक साईभक्तांना प्रसादस्वरूप निंबवृक्षाची रोपे वितरित केली जात आहेत.
सह्याद्री देवराईचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते श्री सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या उपक्रमाचे स्वागत महाराष्ट्रातील विविध प्रमुख मंदिरे करत असून, श्री साईबाबा संस्थान शिर्डीनेही यामध्ये पुढाकार घेतला आहे.
साई सत्चरित्रात उल्लेख केल्यानुसार श्री साईबाबांनी निंबवृक्षाला अत्यंत पवित्र स्थान मानले असून, "या निंबवृक्षाखाली माझ्या गुरूंचे स्थान आहे," असे त्यांनी सांगितले होते. त्याच भक्तिपूर्ण संदर्भातून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करणारी ही योजना सुरु करण्यात आली आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ श्रीमती मंगला वराडे, मुख्य लेखाधिकारी, श्रीमती प्रज्ञा महांडुळे, प्रशासकीय अधिकारी आणि श्री अनिल भणगे, कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
वृक्ष म्हणजेच जीवनदायी ऑक्सिजनचा स्रोत, अन्नाचा आधार आणि पर्यावरणाचा रक्षक. त्यामुळे या "वृक्ष प्रसाद योजना"च्या माध्यमातून भक्तांनी निसर्गसेवेतही सहभाग घ्यावा, असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी केले आहे.