श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला विदर्भात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
दिनांक 10 ऑक्टोबर 2025 ते 16 ऑक्टोबर 2025 या कालावधीत नागपूर व विदर्भातील विविध शहरांमध्ये श्रींच्या पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
या सोहळ्याची सुरुवात नागपूर येथे चिटणवीस मैदानात दिनांक 11 व 12 ऑक्टोबर रोजी झाली. त्यानंतर श्रींच्या पादुका अनुक्रमे
चंद्रपूर (दाताळा साई मंदिर) – दिनांक 13 ऑक्टोबर,
गडचिरोली साई मंदिर – दिनांक 14 ऑक्टोबर,
आणि वर्धा साई मंदिर – दिनांक 15 ऑक्टोबर रोजी दर्शनासाठी पोहोचल्या.
विविध ठिकाणी श्रींच्या पादुकांचे बाईक रॅली, रांगोळ्या, टाळ-मृदुंग, भजनी मंडळे व ढोल-ताशा पथकांद्वारे भव्य स्वागत करण्यात आले. या संपूर्ण दौऱ्यात लाखो भाविकांनी श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले. अनेक ठिकाणी वयोवृद्ध, अंध व अपंग, अनाथालयातील मुले व वृद्धाश्रमातील वृद्ध, भाविकांनीही भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले.
या सोहळ्याचा परमोच्च क्षण दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडला. शेगाव येथे श्री साईबाबा व श्री संत गजानन महाराज संतभेट (बंधूभेट) सोहळा ऐतिहासिक स्वरूपात पार पडला.
भजनी मंडळाने टाळ मृदुंगच्या गजरात “ॐ साई बाबा नमो नमः” या नामघोषात श्री संत गजानन महाराज देवस्थानचे माननीय अध्यक्ष श्री नीलकंठ भाऊ पाटील, तसेच देवस्थान समितीचे व्यवस्थापकीय संचालक व वरिष्ठ अधिकारी यांनी श्रींच्या पादुकांचे भव्य स्वागत केले. श्री संत गजानन महाराजांच्या समाधीसमोर श्रींच्या पादुकांचे व श्री साईबाबांच्या तस्वीरचे पूजन करून दर्शनासाठी मंदिर परिसरातील विठ्ठलाच्या मूर्तीसमोरिल व्यासपीठावर पादुका ठेवण्यात आल्या.
या वेळी श्री गजानन महाराज देवस्थान चे मा. अध्यक्ष महोदयांनी श्रींच्या पादुकांचे पाद्यपूजन केले. हजारो भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत दर्शनाचा लाभ घेतला.
श्री गजानन महाराज देवस्थान समितीतर्फे श्रींच्या स्वागतानंतर सर्वांना भोजन प्रसाद देण्यात आला.
या सोहळ्यासाठी माननीय तदर्थ समिती अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), समिती सदस्य तथा जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांचे मार्गदर्शन लाभले तर श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे,प्रशासकीय अधिकारी श्री संदीप कुमार भोसले, श्री विश्वनाथ बजाज, प्रभारी अधीक्षक श्री रामदास कोकणे, श्री संजय शिंदे, श्री नवनाथ मते, श्री अतुल कुंभकर्ण आदी अधिकारी व कर्मचारी दौऱ्या दरम्यान उपस्थित होते.