शिर्डीत १२-१३ जून रोजी पीएचडीसीसीआयची तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद - सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पर्यटन विकासाचा केंद्रबिंदू
नवी दिल्ली, दि. १० जून २०२६ : पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) यांच्या वतीने, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र पर्यटन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) आणि श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी यांच्या सहकार्याने ‘रूहमॅन्टिक : पीएचडीसीसीआयची तिसरी जागतिक आध्यात्मिक पर्यटन परिषद’ दि. १२ व १३ जून २०२६ रोजी श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या नवीन शैक्षणिक संकुलातील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या वेगाने वाढणाऱ्या आध्यात्मिक पर्यटन क्षेत्राच्या भविष्यासंदर्भात विचारमंथन करण्यासाठी या परिषदेत धोरण निर्माते, पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ, मंदिर प्रशासक, हॉटेल व आदरातिथ्य क्षेत्रातील प्रतिनिधी, ट्रॅव्हल कंपन्या तसेच विविध आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यंदाच्या परिषदेचा विशेष भर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ वर असून, या महोत्सवाला महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पर्यटन विकासासाठी आणि जागतिक पर्यटन आकर्षण वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण संधी म्हणून पाहिले जाणार आहे.
परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचे सचिव श्री भुवनेश कुमार (आयएएस) उपस्थित राहणार आहेत. तसेच श्री निलेश आर. गटणे (आयएएस), व्यवस्थापकीय संचालक, एमटीडीसी; श्री गोरक्ष गाडीलकर (आयएएस), मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी; श्री मंगेश जोशी (आयएएस), संचालक, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय; सौ. जयश्री विष्णू थोरात, अध्यक्षा, शिर्डी नगर परिषद, शिर्डी; तसेच श्री अभय शेळके पाटील, उपाध्यक्ष, शिर्डी नगर परिषद, शिर्डी हे मान्यवर परिषदेला मार्गदर्शन करणार आहेत.
उत्तर प्रदेश शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव (पर्यटन, संस्कृती व धार्मिक कार्य) श्री अमृत अभिजात (आयएएस) यांचे विशेष आभासी (Virtual) प्रमुख भाषण हेही परिषदेचे आकर्षण ठरणार आहे.
या परिषदेदरम्यान PHDCCI-KPMG यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “From Darshan to Destination: The Transformation of Spiritual Tourism in India” या अहवालाचे प्रकाशन होणार आहे. यात्रेकरूंच्या बदलत्या प्रवृत्ती, नव्या पर्यटन संकल्पना, आवश्यक पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन आणि श्रद्धा-आधारित पर्यटनाचा वाढता आर्थिक प्रभाव यावर या अहवालात सविस्तर प्रकाश टाकण्यात आला आहे.
परिषदेत पुढील विषयांवर विशेष सत्रे आयोजित करण्यात आली आहेत :
‘सिंहस्थ २०२७ : कुंभ ते आध्यात्मिक पर्यटन कॉरिडॉर’ – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून प्रादेशिक विकास आणि जागतिक दर्जाचे आध्यात्मिक पर्यटन परिसंस्था उभारण्याविषयी चर्चा.
‘२४ तास आध्यात्मिक अनुभवांची निर्मिती’ – रात्रकालीन पर्यटन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पर्यटक सहभाग वाढविण्याच्या संधींचा आढावा.
‘श्रद्धेची वास्तुरचना’ – मंदिर वास्तुकला, वारसा संवर्धन आणि सांस्कृतिक कथन यांचा पर्यटन अनुभवावर होणारा परिणाम.
‘रूहमॅन्टिक रिफ्लेक्शन्स’ – अध्यात्म, आरोग्य आणि सजग प्रवास (Mindful Travel) यांतील वाढता संबंध.
परिषदेच्या निमित्ताने सहभागी प्रतिनिधींना श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन तसेच नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग येथे अभ्यासदौरा (Familiarization Visit) आयोजित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.