Languages

   Download App

श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणालीचा शुभारंभ

श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणालीचा शुभारंभ

शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणालीचा शुभारंभ
भाविकांच्या सुरक्षेसोबतच दर्शन व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ही प्रणाली Prisma AI कंपनीच्या देणगीतून उपलब्ध झाली असून, तिचा शुभारंभ आज (दि. ११ सप्टेंबर २०२५) श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि Prisma AI चे अध्यक्ष डॉ. श्रीराम अय्यर यांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी व CCTV विभागप्रमुख राहुल गलांडे यांच्यासह Prisma AI चे वरिष्ठ अधिकारी अमिताभ रॉय चौधरी (Group COO) तसेच संस्थानचे विविध विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
नवीन प्रणालीद्वारे मंदिर परिसरातील प्रमुख प्रवेशद्वारांवरून येणाऱ्या भाविकांची अचूक नोंद होणार आहे. दर्शनानंतर ‘मुखदर्शन आऊट’ व ‘बुंदी प्रसाद आऊट’ येथेही भाविकांचे आऊट काउंटिंग करण्यात येणार असून, यामुळे दररोज श्री साईबाबांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची शास्त्रशुद्ध आकडेवारी संस्थानाकडे उपलब्ध राहील. ही माहिती गर्दी नियंत्रण, सुविधा व्यवस्थापन व नियोजनबद्ध सेवा यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
प्रणालीत फेस डिटेक्शन तंत्रज्ञानाचाही समावेश असून, संशयित अथवा गुन्हेगारांचे फोटो पूर्वनियोजित पद्धतीने डेटाबेसमध्ये अपलोड केले जातील. अशा व्यक्तींची उपस्थिती आढळल्यास सुरक्षा यंत्रणेला तत्काळ सूचना मिळून त्वरित कारवाई करता येईल. यामुळे मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत लक्षणीय बळकटी येणार आहे.
भाविकसंख्येच्या अचूक नोंदीमुळे भोजन, निवास व अन्य सुविधा अधिक नियोजनबद्धपणे उपलब्ध करून देता येतील. तसेच गर्दीच्या वेळी गेटनिहाय भाविकांचे विभाजन करून दर्शन प्रक्रियाही अधिक सुकर होणार आहे. सध्या ही प्रणाली नवीन दर्शन रांग येथील कॅमेऱ्यांवर सुरू करण्यात आली असून, आगामी काळात पालखी रोडसह पोलीस स्टेशनच्या अखत्यारीतील कॅमेरेही या यंत्रणेशी जोडले जाणार आहेत.
ही AI आधारित पीपल काउंटिंग प्रणाली शिर्डी श्री साईबाबा संस्थानाच्या दर्शन व सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रात अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वास संस्थानातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.

Undefined
श्री साईबाबा संस्थानात अत्याधुनिक AI आधारित ‘पीपल काउंटिंग’ प्रणालीचा शुभारंभ
Thursday, September 11, 2025 - 15:15