शिर्डी,
श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या साईभक्त रघु सुंदरम यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
रघु सुंदरम हे "ओस्टिओजेनिसिस इम्परफेक्टा" या अत्यंत दुर्मिळ अनुवांशिक विकाराने त्रस्त असूनही, साईसेवेच्या कार्यात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. या आजारामुळे त्यांच्या शरीराची हाडे सहज फ्रॅक्चर होतात, सांधे सैल असतात आणि उंचीवर मर्यादा येते. तरीही त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्व संकटांवर मात करत, श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रसार आपले ध्येय मानले आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी एका अपघातानंतर त्यांना आलेल्या अध्यात्मिक साक्षात्काराने त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली. त्यांनी श्री साई सच्चरित्राचे रोज पारायण करण्याची नित्य दिनचर्या अंगीकारली. इतकेच नव्हे तर त्यांनी साईभक्तांचा सामूहिक प्रार्थना समूह स्थापन करून शेकडो भाविकांना साईमार्गाशी जोडले.
साईसंदेशाचा प्रचार-प्रसार करत असताना त्यांनी श्री साई सच्चरित्राच्या तमिळ भाषांतर व संपादन कार्यातही मोलाचा सहभाग दिला आहे. दरवर्षी शिर्डी येथे येऊन श्री साईंबाबांच्या समाधीचे दर्शन घेणारे रघु सुंदरम आपल्या कमाईतील मोठा हिस्सा साई संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करतात – ही त्यांची सेवा भाविकांना अतीव प्रेरणा देणारी आहे.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी रघु सुंदरम यांच्याशी संवाद साधत त्यांच्या निष्ठेचे आणि सेवाभावाचे कौतुक करत त्यांचा सत्कार केला .
संकटांवर मात करत, अध्यात्माच्या आधाराने समाजसेवा करणाऱ्या रघु सुंदरम यांचे कार्य खरोखरच श्री साईबाबांच्या "श्रद्धा आणि सबुरी" या शिकवणीचे ज्वलंत उदाहरण ठरते.