शिर्डीत मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी आणि ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशन, अहमदाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया शिबिराचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी ते सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिरादरम्यान एकूण ११० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५२ गरजू रुग्णांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या उपक्रमामुळे परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी श्री साईनाथ रुग्णालय येथील डॉ. राम नाईक, डॉ. विद्या बोराडे, डॉ. महेंद्र तांबे, डॉ. मिलाप, डॉ. विनय, डॉ. दीपक नजन, डॉ. पल्लवी जगताप, डॉ. प्राजक्ता बनकर, अधीसेविका नजमा सय्यद यांच्यासह नर्सिंग स्टाफ, जनरल सर्जरी विभागातील कर्मचारी तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांवर सुरक्षित आणि यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या.
या शिबिराचा समारोपीय कार्यक्रम सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी येथे पार पडला. समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी भूषविले. यावेळी ग्लोबल किडनी स्टोन फाउंडेशनचे डॉ. केतन शुक्ला, अमेरिकेवरून आलेले शशांक पाशुमार्थी, तसेच श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे उपस्थित होते.
समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही अशा सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्य राखण्याचा मानस व्यक्त केला. गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हेच साई संस्थानचे प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. शिबिरादरम्यान डॉक्टरांनी किडनी स्टोन होण्याची कारणे, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच नियमित व पुरेसे पाणी पिण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे यांनी केले, तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. संस्थानच्या वतीने भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांद्वारे सर्वसामान्यांना दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




