Download App

News

News

श्री पुण्‍यतिथी उत्‍सवाचा आज मंगलमय वातावरणात सुरुवात

October 17th, 2018

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०० वा श्री पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली असून प्रवेशव्‍दारावर ब्रह्मांडनायक या आकर्षक देखावाने व समाधी मंदिर व परिसरात केलेल्‍या विद्युत रोषणाई आणि आकर्षक फुलांच्‍या सजावटीने साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतले.

उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ५ वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम यांनी विणा, विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी पोथी आणि विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर व बिपीनदादा कोल्‍हे यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके, उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकम, मनोज घोडे पाटील, प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठया संख्‍येने उपस्थित होते. मिरवणूक व्‍दारकामाईत आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला. विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर यांनी प्रथम, सौ.सरस्‍वती वाकचौरे यांनी व्दितिय, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ.योगिताताई शेळके यांनी तृतिय, सौ.नलिनी हावरे यांनी चौथ्‍या व सौ.प्रिया कदम यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले. तर अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्‍यात आले.

सकाळी ६.१५ वाजता समाधी मंदिरात संस्‍थानचे उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदम व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.प्रिया कदम यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती झाली, दुपारी ४.०० वाजता ह.भ.प.श्री.विवेक गोखले, नृसिंहवाडी यांचे किर्तन झाले तर सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती झाली. रात्रौ ७.३० ते १०.१५ यावेळेत श्री.प्रसाद कांबळी, मुंबई प्रस्‍तुत देवबाभळी हा नाटकचा कार्यक्रम संपन्‍न झाला. रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक काढण्‍यात आली. मिरवणूकीनंतर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती झाली. तसेच आज उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी राज्‍याचे पशुसंवर्धन व दुग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री, श्री.महादेव जानकर यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

उद्या गुरुवार दिनांक १८ ऑक्‍टोबर हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती व श्रींच्‍या फोटोची आणि पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी ६.०० वाजता संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा, सकाळी ९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.विवेक गोखले यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होवून सकाळी १०.३० वाजता आराधना विधी व दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.०० यावेळेत श्री.महेश काळे, मुंबई व श्री.राहूल देशपांडे, मुंबई यांचा भजन संध्‍या हा कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. उत्‍सवाचा हा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील.

Recent News