श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने येत्या श्री पुण्यतिथी (दसरा) उत्सवापासून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता पालखीव्दारे येणा-या पदयात्री साईभक्तांकरीता स्वतंत्र पालखी गेट सुरु करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
डॉ.हावरे म्हणाले, महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कानाकोप-यातुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी पालखीव्दारे पदयात्री शिर्डी येथे येत असतात. यामध्ये श्री रामनवमी, श्री पुण्यतिथी, श्री गुरुपौर्णिमा, श्री दत्तजयंती आदि उत्सवात पदयात्री पालख्यांव्दारे सहभागी होतात. वर्षभरात सुमारे ६५० पालख्यांव्दारे सुमारे ०२ लाखाहुन अधिक पदयात्री साईभक्त शिर्डी येथे येतात. या येणा-या पदयात्रींना श्रींच्या दर्शनाकरीता स्वतंत्र गेट असावे, अशी मागणी संस्थान व्यवस्थापन समितीकडे पालखी पदाधिका-यांकडून वारंवार होत होती. त्यानुसार संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांना पालखीव्दारे येणा-या पदयात्रीकरीता स्वतंत्र गेट करता येईल का? असे विचारणा केली असता, त्यांनी प्रशासकीय शहानिशा करुन पालखीव्दारे येणा-या पदयात्री साईभक्तांना श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता वेगळे पालखी गेट सुरु करता येईल असा अभिप्राय दिला आहे.
पालखीतील पदयात्रींच्या भावनांचा विचार करुन व सुरक्षा यंत्रनेच्या अभिप्रायाअंती येत्या श्री पुण्यतिथी (दसरा) उत्सवापासून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता पालखीव्दारे येणा-या पदयात्री साईभक्तांना स्वतंत्र पालखी गेट सुरु करण्यात येणार आहे. याकरीता पालखी प्रमुखांनी पालखी निघण्यापुर्वी संस्थानच्या संरक्षण विभागात नोंदणी करणे गरजेचे असल्याचे ही डॉ.हावरे यांनी सांगितले.