Languages

   Download App

News

News

*श्री साईबाबा संस्थान व बाबांविषयी अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई*
श्री साईबाबा संस्थान व श्री साईबाबांविषयी समाज माध्यमे व प्रसारमाध्यमांवर पसरविली जात असलेली चुकीची, दिशाभूल करणारी व बदनामीकारक माहिती ही अतिशय गंभीर व दु:खद बाब आहे. याविरोधात संस्थानकडून कठोर कायदेशीर पावले उचलण्यात येत असून, अशा प्रकारच्या अपप्रचाराला कदापिही प्रोत्साहन दिले जाणार नाही, अशी माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.
अलीकडेच सोशल मीडियावर “श्री साईबाबा संस्थानने हज यात्रेसाठी ₹३५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे” असा भ्रामक व खोटा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. संस्थानने यासंदर्भात स्पष्टपणे सांगितले आहे की, अशा कोणत्याही प्रकारचा निधी वितरित केलेला नाही. हा संपूर्ण दावा खोटा, निराधार व श्रद्धाळू भावनांशी खेळ करणारा आहे.
याचप्रमाणे, अजय गौतम व गौतम खट्टर या व्यक्तींनी श्री साईबाबांविषयी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित केलेली आक्षेपार्ह व अपमानास्पद विधाने निषेधार्ह असून, संस्थानने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावून, राहाता येथील माननीय न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला हाेेता. यावर न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम आदेश देत संबंधित व्यक्तींना श्री साईबाबांविषयी कोणतीही बदनामीकारक किंवा अपमानकारक विधाने करण्यास मनाई केली आहे.
श्री साईबाबा संस्थानचा संपूर्ण कारभार महाराष्ट्र शासन पारित “श्री साईबाबा संस्थान विश्वस्थ व्यवस्थापन अधिनियम, २००४” नुसार पारदर्शकपणे व नियमबद्ध रीतीने केला जातो. संस्थानमध्ये येणाऱ्या देणग्यांचा उपयोग ५५० खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल, आशियातील सर्वात मोठे प्रसादालय, शैक्षणिक संकुल, भक्तनिवास, आणि इतर सार्वजनिक हिताच्या उपक्रमांसाठी केला जातो. देणगी फक्त अधिकृत दानपेट्या व अधिकृत काउंटरवरच स्वीकारली जाते. इतर कोणतीही आर्थिक देवाणघेवाण केली जात नाही.
संस्थानच्या तदर्थ समितीस ₹५० लाखांपर्यंतच्या खर्चाचे स्वातंत्र्य आहे. त्यापुढील सर्व खर्चांसाठी माननीय उच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.
श्री साईबाबांवरील प्रेम, श्रद्धा व भक्ती जपणाऱ्या लाखो भक्तांच्या भावना आणि संस्थानची प्रतिष्ठा राखण्यासाठी, भविष्यातही अशा प्रकारच्या अपप्रचार करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. गाडीलकर यांनी स्पष्ट केले.

Recent News