Languages

   Download App

News

News

मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीरामध्‍ये ३२ गरजु रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया

December 14th, 2019

शिर्डी -

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था,‍ शिर्डी व गीव्‍ह मी फाईव फाऊंडेशन, औरंगाबाद यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईनाथ रुग्‍णालयात दिनांक ०९ डिसेंबर ते दिनांक १० डिसेंबर २०१९ याकालावधीत मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले होते. या शिबीरामध्‍ये ३२ गरजु रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आल्‍या असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था,‍ शिर्डीच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयाच्‍या वतीने वर्षभर विविध शिबीरांचे आयोजन करण्‍यात येत असते. यामध्‍ये श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीर आयोजन करण्‍याची ही दुसरी वेळ असुन यापुर्वी श्री साईबाबांच्‍या समाधी शताब्‍दी वर्षानिमित्‍त हे शिबीर आयोजित करण्‍यात आलेले होते. त्‍याचप्रमाणे दिनांक ०९ डिसेंबर ते दिनांक १० डिसेंबर २०१९ याकालावधीत मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करण्‍यात आले असून या शिबीरामध्‍ये प्रामुख्‍याने जळीत रुग्‍णांची चिकटलेले हात, चिकटलेले खांदे, जन्‍मजात चिकटलेली बोटे, चिकटलेली मान, हात व पायाचा हत्‍तीरोग अशा विविध प्रकारच्‍या ३२ गरजु रुग्‍णांवर गुंतागुंतीच्‍या शस्‍त्रक्रिया करण्‍यात आलेल्‍या आहेत. अशा प्रकारच्‍या शस्‍त्रक्रियेकरीता होणारा खर्च सर्व सामान्‍य रुग्‍णांना न परवडणारा असल्‍यामुळे संस्‍थानने पुढाकार घेवुन मोफत प्‍लॅस्‍टीक सर्जरी शिबीराचे आयोजन करुन गरजु रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया मोफत केलेल्‍या आहेत. यामध्‍ये उपचारा बरोबरच रुग्‍णांना लागणारी आवश्‍यक औषधे देखील मोफत देण्‍यात आलेली आहेत. तसेच शिबीरार्थी रुग्‍णांना मोफत जेवण व रुग्‍णांच्‍या नातेवाईकांची राहण्‍याची व्‍यवस्‍था देखील संस्‍थान मार्फत मोफत करण्‍यात आली असल्‍याचे सांगुन अशा विविध प्रकारची शिबीरे श्री साईनाथ रुग्‍णालयात घेण्‍याचा मानस असून गरजु रुग्‍णांनी वेळोवेळी शिबीरांमध्‍ये सहभागी होवुन लाभ घ्‍यावा असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले.

या शिबीराकरीता गीव्‍ह मी फाईव फाऊंडेशन, औरंगाबाद यांच्‍यामार्फत सुप्रसिध्‍द प्‍लॅस्‍टीक सर्जन डॉ.राम चिलगर यांच्‍या समवेत केरळ येथील डॉ.उन्‍नी कृष्ण्‍ण, औरंगाबाद येथील डॉ.निलेश तायडे, श्रीरामपुर येथील डॉ.अदित्‍य दमाणी, औरंगाबाद येथील भुलतज्ञ डॉ.सुजित खाडे व त्‍यांची टिम यांचे मौलाचे सहकार्य लाभले.

तसेच शिबीर यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी श्री.अशोक औटी, वैद्यकिय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकिय अधिक्षीका डॉ.मैथिली पितांबरे, जनरल सर्जन डॉ.राम नाईक, डॉ.गजानन पाटील, भुलतज्ञ डॉ.महेंद्र तांबे, डॉ.गोविंद कलाटे तसेच रुग्‍णालयाचे परिचारक, परिचारीका व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Recent News