Languages

   Download App

News

News

श्री साईबाबा समाधी मंदिराची वर्ल्‍ड बुक ऑफ रेकॉर्डसमध्‍ये नोंद

November 29th, 2019

शिर्डी –

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईबाबा समाधी मंदिराची वर्ल्‍ड बुक ऑफ रेकॉर्डस, लंडन या जागतिक दर्जाच्‍या संस्‍थेने सर्वाधिक लोकांनी भेटी दिलेले मंदिर म्‍हणून सन्‍मा‍ननीय अशा वर्गवारीत जागतिक स्तरावर नोंद घेण्‍यात आली असून याबाबतचे पत्र संस्‍थानप्राप्‍त झाले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स हे जागतिक नेटवर्कसह ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि भारत येथे कार्यरत आहेत. जागतिक रेकॉर्डस् च्या माध्यमातून संभाव्य प्रतिभा आणि क्षमतांना ही संस्था आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रासह मान्यता प्रदान करते. त्याशिवाय मानवता आणि वैश्विक शांततेसाठी लक्षणीय सहभाग देणाऱ्या व्यक्ती आणि स्थाने यांची नोंद घेऊन ही संस्था त्यांचा सन्मानही करते. श्री साईबाबांच्‍या समाधीच्‍या दर्शनाकरीता परदेशाच्‍या व देशाच्‍या कानाकोप-यातून सर्वाधिक भाविक शिर्डी येथे येतात. दररोज ५० ते ६० हजार भाविक भेट देत असून संस्‍थान उत्‍सव व सुट्टीच्‍या दिवशी ही संख्‍या एक लाखाहुन अधिक असते. याबाबींची दखल घेवुन लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स समितीच्या समितीने श्री साईबाबा समाधी मंदिर भारतातील सर्वात जास्त लोकांनी भेट दिलेल्या मंदिरांपैकी एक म्हणून यादीमध्‍ये नोंद केल्‍याबाबतचे पत्र प्राप्‍त झाले आहे.

त्‍या पत्रात त्‍यांनी म्‍हणटले आहे की, आपल्याला कळविण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे की वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडनच्या समितीने श्री साईबाबा समाधी मंदिर (महाराष्ट्र) भारत यांचा भारतातील सर्वाधिक भेट दिल्या गेलेल्या मंदिरांपैकी एक अशी नोंद केली आहे. ही एक धर्मनिरपेक्ष जागा असून येथे सर्व-धर्म-समभाव आहे आणि त्यापैकी श्रद्धा आणि सबुरी यांच्या शक्तीवर सर्वाधिक विश्वास केला जातो. एक अशी जागा जिथे सर्वजण प्रार्थनेमध्ये नतमस्तक होतात, जिथे श्रद्धेचे महत्व आहे आणि जिथे आशा बांधल्या जातात, सबुरीची फळे मिळतात आणि जिथे सर्वदूर एका कायम समाधानाचे आणि अतीव आनंदाचे राज्य असते. ज्यांनी आपल्या शुद्ध समता भावनेतून मानवतेचा आणि शांततेचा असा ‘सबका मालिक एक’ हा मंत्र दिला त्या सामंजस्याचा खराखुरा खजिना असलेल्या दिव्य संतांचे हे स्थान आहे. श्री साईबाबांच्या पदक्षेपाने ही भूमी एक पवित्र स्थान झाले आहे, असे कळविलेले असल्‍याचे सांगुन लवकरच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अधिकारी शिर्डीला येवुन हे नोंदणीपत्र संस्‍थानला बहाल करणार असल्‍याचेही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्, लंडन मध्‍ये श्री साईबाबा समाधी मंदिराची नोंद झाल्याबद्दल भारत आणि ब्रिटन या देशांमधील अधिकारी तसेच श्री.वीरेंद्र शर्मा, (संसद सदस्य, इंग्लंड) आणि डॉ.दिवाकर सुकुल (अध्यक्ष, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्–लंडन) आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील अनेकांनी श्री.मुगळीकर यांचे अभिनंदन केले आहे.

Recent News