शिर्डीः-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१९ ते गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१ वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार असून उत्सवाच्या मुख्य दिवशी दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याचे सांगुन साईभक्तांनी या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होवून उत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले.
श्री.मुगळीकर म्हणाले, साईबाबांनी १०० वर्षांपुर्वी दस-याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. ज्यामुळे विजयादशमी म्हणजे श्री साईबाबांची पुण्यतिथी अशी एक नवी ओळख या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्सव साजरा करतात. त्यानुसार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१९ ते दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या काळात १०१ वा श्री पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येत असून उत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
उत्सवाचे प्रथम दिवशी सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ५.१५ वाजता व्दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराचे शेजारील स्टेजवर होणार आहे. सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होणार आहे. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक होणार आहे. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. उत्सवाचा हा पहिला दिवस असल्यामुळे अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहील.
मंगळवार, दिनांक ०८ ऑक्टोबर हा उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्ती व श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होवून सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिराचे समोरील मुख दर्शन हॉल स्टेजवर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक काढण्यात येईल. उत्सवाचा हा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तर रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींचे समोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.
बुधवार, दिनांक ०९ ऑक्टोबर उत्सवाच्या तृतिय दिवशी सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम होईल. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.
उत्सवाच्या सांगता दिवशी गुरुवार, दिनांक १० ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५.२० वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ६.४५ वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पुजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहिहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती, रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत निमंत्रित कलाकार कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.