Languages

   Download App

News

News

श्री रामनवमी उत्‍सव तयारी प्रेसनोट (SSST, SHIRDI)

April 8th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०१९ ते रविवार दिनांक १४ एप्रिल २०१९ अखेर साजरा करण्‍यात येणा-या श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून याकालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.

श्री मुगळीकर म्‍हणाले, श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून प्रतीवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्‍ताने शुक्रवार १२ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वा. व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण, ५.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४.०० वा. ते सायं.६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ६.३० वा.धुपारती होणार आहे. सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत श्री.निनाद आजगांवकर, मुंबई यांचा गीतरामायण हा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९.१५ वा. चावडीत श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.

शनिवार, दिनांक १३ एप्रिल रोजी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. पहाटे ५.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्‍नान होईल. सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल. सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत श्री.सुदेश भोसले, मुंबई यांचा भावगीत/भक्‍ती संगीत हा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक १३ एप्रिल रोजीची नित्‍याची शेजारती व दिनांक १४ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.

उत्‍सवाच्‍या सांगता दिनी रविवार, दिनांक १४ एप्रिल रोजी पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ६.३० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक, सकाळी १०.३० वा. गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायं.६.३० वा. धुपारती होणार असून सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत कैलास हरेकृष्‍णा दास, नागपूर (इंटरनॅशनल आर्टीस्‍ट आकाशवाणी रेडीओ सिंगर) यांचा साई भजन संध्‍या हा कार्यक्रम होणार आहे. तर रात्रौ १०.३० वा. श्रींची शेजारती होईल.

उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी याकरिता उन्‍हापासून संरक्षणासाठी मंदिर व परिसरात मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच साईभक्‍तांच्‍या अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थे करीता साईनगर मैदान, साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) व साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे ५५ हजार चौ.फुट बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये विद्युत, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आलेली आहे. याबरोबरच मुंबई व परिसरातून पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय व्‍यवस्थितरित्‍या होण्‍यासाठी संस्‍थानच्‍या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी कापडी मंडप कनात बिछायतीसह उभारण्‍यात आलेले असून यामध्‍ये विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्‍यात आलेली आहे. तसेच पालख्‍या शिर्डी येथे आल्‍यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. सिन्‍नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्‍यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्‍यात आले आहे. तसेच गुरुस्‍थान मंदिरासमोर, दर्शनरांग, नविन भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईआश्रम, जुने प्रसादालय व नवीन श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार आहे. उत्‍सव कालावधीत भक्‍तांना दर्शन रांगेतून बुंदी प्रसाद वाटप व प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी १९० क्विंटल साखरेचे अतिरिक्‍त लाडू व बुंदी तयार करण्‍यात आलेली आहे.

श्रीरामनवमी उत्‍सवानिमित्‍त समाधी मंदिर व परिसरात दिल्‍ली येथील दानशूर साईभक्‍त श्रीमती स्‍नेहा शर्मा यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट व मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने विद्युत रोषणाई करण्‍यात येणार आहे. तसेच उत्‍सवातील तीन दिवसाकरीता प्रसाद भोजनासाठी दानशूर देणगीदार साईभक्‍त श्री.आर.एस.हरी त्रिची, नितिशकुमार आणि निलेशकुमार , वेकंट रतन कुमार हैद्राबाद, सौ.प्रियंका व आयुष पोतदार, सौ.भारती शिरगुरकर, श्रीमती वृदां सुंदरम दिल्‍ली, बाबुराव अनकडे नांदेड, राजगोपाल नटराजन चेन्‍नई, व्‍ही.व्‍ही राघवन मुंबई, शेखर बुरा हैद्राबाद, सुनिल अग्रवाल मुंबई, श्रीकांत विश्‍वनाथन चेन्‍नई, साईनाथ गारमेंट मुंबई व ज्‍योतीराम्मी पोला बेंगलोर यांनी देणगी दिलेली आहे.

उत्‍सव कालावधीमध्‍ये रोज सायं. ७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम होणार आहेत. उत्‍सवाचे निमित्‍ताने व्‍दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्‍चरिताच्‍या अखंड पारायणामध्‍ये जे साईभक्‍त भाग घेवू इच्‍छीतात अशा साईभक्‍तांनी आपली नावे गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०१९ रोजी दुपारी १.०० वा. ते सायंकाळी ५.३०वा. यावेळेत समाधी मंदिरातील व्‍यासपीठावर नोंदवावीत. त्‍याच दिवशी सोडत पध्‍दतीने पारायणसाठी भक्‍तांची नावे सायंकाळी ५.३५ वा. निश्चित करण्‍यात येतील. तसेच दिनांक १३ एप्रिल या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी होणारे कलाकारांचे हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकरांनी आपली नावे त्‍याच दिवशी समाधी मंदिराशेजारील अनाऊन्‍समेंट सेंटरमध्‍ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत असे सांगून सर्व साईभक्‍तांनी या उत्‍सवास उपस्थित राहून उत्‍सवाची शोभा वाढवावी असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले आहे.

Recent News