श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्ती मिरवणूकीत संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के) यांनी पोथी, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी वीणा तर उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे व मेकॅनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला यावेळी प्रशासकिय अधिकारी संदीपकुमार भोसले, मंदिर विभाग प्रमुख विष्णु थोरात, प्र.जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ०६.२० वाजता श्रींचे मंगलस्नान झाले. सकाळी ०७.०० वाजता श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्त संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी ८.०० वाजता लेंडीबागेतील शताब्दी ध्वजाचे संस्थानचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के) व त्यांचे पती श्री. प्रेमानंद सोनटक्के तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.
सकाळी ०९.०० ते ११.३० यावेळेत श्री सुमित पोंदा, भोपाल यांचा श्री साई अमृत कथा कार्यक्रम झाला. तर, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री. निरज शर्मा, नवी दिल्ली यांचा साईभजन कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत ह.भ.प. सौ. वेदश्री ओक, बोरीवली यांचा कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते १०.०० यावेळेत ज्येष्ठ गायिका अनुराधाजी पौडवाल, मुंबई यांचा साई संध्या कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर होणार असून, रात्रौ ०९.१५ वाजता श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक निघणार आहे. आज गुरुवार असल्याने नित्याचे चावडी पुजन होईल. आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी उघडे राहणार असून आजची श्रींची शेजारती व उद्या दिनांक ११ जुलै रोजीची पहाटेची श्रींची काकड आरती होणार नाही. आज रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन (हजेरी) कार्यक्रम मंदिराशेजारील स्टेजवर होईल. उत्सवानिमित्त अमेरीका येथील दानशूर साईभक्त श्रीमती सुभा पै यांच्या देणगीतुन मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
आज श्री गुरुपौर्णिमा उत्सवाचे मुख्य दिवशी चेन्नई, तामीळनाडू येथील श्रीमती ललिता मुरलीधरन व कॅ. मुरलीधरन या साईभक्ताने साईचरणी ०३ लाख ०५ हजार ५३२ रुपये किंमतीचा ५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण हिरे जडीत ब्रोच श्री साईचरणी अर्पण केला. तर एका साईभक्ताने सुमारे २ किलो वजनाचा चांदीचा आकर्षक हार आणि सुमारे ५९ लाख रूपये किंमतीचा ५६६ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सोन्याचा मुकुट श्री साईबाबांच्या चरणी अर्पण अर्पण केला, सदर देणगीदार साईभक्ताच्या विनंतीनुसार त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
उत्सवाच्या सांगता दिनी शुक्रवार दिनांक ११ जुलै रोजी पहाटे ०६.०० वाजता श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वाजता गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक होणार असून, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. सौ. प्राची व्यास, बोरीवली यांचे काल्याचे कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० चे दरम्यान श्रींची माध्यान्ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री रोहित दुग्गल, श्रीरामपुर यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होणार असून. दुपारी ०४.०० ते ०६.०० वा. यावेळेत श्री हिमांशु जुनेजा, सहारणपुर यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होईल. सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. सायं. ०७.३० ते ०९.३० वा. यावेळेत पद्मश्री मदनसिंह चौहान, रायपुर यांचा साई भजनसंध्या कार्यक्रम होईल. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल.