Languages

   Download App

News

News

शिर्डी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा – ४८ आदर्श कर्मचाऱ्यांचा सत्कार

 

शिर्डी (प्रतिनिधी) – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने आज, १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा संयुक्त कार्यक्रम सकाळी ७.१० वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आदर्श कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मुख्य लेखाधिकारी श्रीमती मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी तसेच सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, शैक्षणिक संकुलाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना श्री. गाडीलकर यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये झालेल्या बलीदान व योगदानाची आठवण करून दिली. त्यांनी संस्थानच्या कार्यात कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक करत, भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सेवा कार्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत असल्याचे सांगितले. मागील वर्षभरात साईनाथ हॉस्पिटलमध्ये सुरू करण्यात आलेल्या नेत्रपेढीमुळे तीन रुग्णांना नेत्रदानाद्वारे दृष्टी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

त्याचप्रमाणे, संस्थान अंतर्गत साईबाबा हॉस्पिटल व साईनाथ रुग्णालय पेपरलेस करण्याचे नियोजन, बारावी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या CET कोर्सेस, तसेच नव्याने सुरू झालेल्या स्विमिंग टँक व बॅडमिंटन हॉल याबाबत माहिती देण्यात आली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या रजा-सुट्ट्यांची मागणीही पूर्ण केल्याची माहिती श्री. गाडीलकर यांनी दिली.

कार्यक्रमात विविध विभागांतील एकूण ४८ कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी म्हणून प्रशस्तीपत्र, श्रींची प्रतिमा, शाल व गुलाबफूल देऊन सत्कार करण्यात आला. यात विश्वनाथ बजाज, दादा जांभुळकर डॉ. अक्षयानंद जाधव, अनिल पंधे, राम पुंड, मधुकर गव्हाणे, सुभाष खडांगळे, राजाराम साळवे, कारभारी काटकर, बाळासाहेब वाघमारे, गोरख कुमावत, सुनिता माळी, दत्तात्रय गायकवाड, कैलास डांगे, हरिभाऊ फुंदे, संभाजी सुपेकर, बाळासाहेब कोते, सुभाष खरात, भानुदास कोते, भिका ठाकरे, श्रीमती चंद्रकला कानडे, एकनाथ वाकचौरे, कमलेश त्रिभुवन, भागवत डांगे, अनिल गायकवाड, रामनाथ साबळे, विलास धनवटे, प्रकाश धोत्रे, रमेश चव्हाण, अमोल गोसावी, पुष्पा होन, श्रद्धा सोनवणे, रावसाहेब खोमणे, बाळासाहेब सदाफळ, अंबादास व्‍हनमाने, सचिन हरळे, शरद शेळके, दगडू अनर्थे, शाहू सोमवंशी, जालिंदर तुरकणे, श्रीराम थोरात, श्रीमती संगीता गांगुर्डे, सविता पाळंदी, जगन्नाथ नवले, ऋषिकेश तुरकणे, शिवाजी गुळवे, रवींद्र शेजवळ, बाळासाहेब धीवर आदी कर्मचारी सहभागी होते.

तसेच, श्री साईबाबा शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी अभिषेक प्रमोद नागरे यांची MPSC परीक्षेतून दिवाणी व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वसंत वाणी व राजेंद्र कोहकडे यांनी केले.

Recent News