श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये मिट्रल व्हॉल्व रिपेअर सर्जरी शिबीर यशस्वी
शिर्डी – श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दि. १३ व १४ ऑक्टोंबर २०२५ रोजी मिट्रल व्हॉल्व रिपेअर सर्जरी शिबीर यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये एकूण ७ रुग्णांवर अत्यंत जटिल पण यशस्वी मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
खाजगी रुग्णालयात अशा शस्त्रक्रियांसाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. मात्र, श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. शिबीरासाठी अहमदाबाद येथील प्रसिद्ध कार्डिएक सर्जन डॉ. प्रियंकर सिन्हा यांनी प्रमुख शल्यचिकित्सक म्हणून कार्य केले, तर त्यांना श्री साईबाबा हॉस्पिटलचे कार्डिएक सर्जन डॉ. महेश मिस्त्री आणि डॉ. श्रेयश पोतदार यांनी सहकार्य केले.
या सर्जरीदरम्यान भुलतज्ञ म्हणून डॉ. संतोष मराठे आणि डॉ. विजय कर्डीले यांनी काम पाहिले, तसेच परफ्युजनिस्ट म्हणून नदीम अहमद व शुभम पाचपिंड यांनी सहकार्य केले. संपूर्ण कार्डिएक सर्जरी युनिटने या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर शिबीराचे आयोजन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एकूण सुमारे ३५ लाख रुपयांच्या खर्चाच्या या शस्त्रक्रिया रुग्णांसाठी विनामूल्य पार पाडण्यात आल्या.
रुग्णांचे नातेवाईक यांनी सांगितले की, “शिर्डीच्या पावन भूमीत श्री साईबाबा यांच्या प्रेरणेने चालणाऱ्या या हॉस्पिटलमध्ये आमच्या रुग्णांना नवजीवन लाभले आहे. ही खरी रुग्णसेवा म्हणजे ईश्वरसेवा आहे.”
कार्डिएक सर्जन डॉ. महेश मिस्त्री म्हणाले, “मिट्रल व्हॉल्व पूर्णपणे बदलण्याऐवजी नैसर्गिक व्हॉल्व दुरुस्त करण्याचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आता उपलब्ध आहे. या शिबिरात रुग्णांना त्यांचा स्वतःचा व्हॉल्व रिपेअर करून मिळाला असून, त्यामुळे त्यांना आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावे लागणार नाही.”
“रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” या श्री साईबाबांच्या शिकवणुकीतूनच श्री साईबाबा संस्थानने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ जनरल हॉस्पिटल सुरू केले आहे. या हॉस्पिटलमध्ये आजवर अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत.
या यशस्वी शिबीराबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, वैद्यकीय संचालक ले.कर्नल (से.नि.) डॉ. शैलेश ओक, तसेच उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांनी श्री साईबाबा हॉस्पिटलमधील कार्डिएक विभागाचे व अहमदाबाद येथील डॉ. प्रियंकर सिन्हा यांचे अभिनंदन केले आहे.