श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने दिपावली निमित्त संस्थान कर्मचा-यांना त्यांच्या मागील वर्षातील एकुण वार्षीक वेतनाच्या ८.३३ टक्के इतके सानुग्रह अनुदान देण्यास राज्यशासनाने मान्यता दिली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्हणाले, श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचा-यांना १९७७ पासून सानुग्रह अनुदान प्रत्येक दिवाळीपुर्वी दिले जाते. त्याअनुषंगाने याही वर्षी संस्थान कर्मचा-यांना एकूण वेतनाच्या ८.३३ टक्के दराने होणारी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देणेबाबत व्यवस्थापन समितीने दिनांक २६ जुलै २०१९ रोजीचे सभेत मान्यता दिली होती. तथापि सदरचे सानुग्रह अनुदान कर्मचा-यांना आदा करण्यापुर्वी विधी व न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांची मान्यता घेण्यात यावी असे ठरले. त्यानुसार सदरचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असता संस्थानच्या आस्थापनेवरील कायम व कंत्राटी कर्मचा-यांना माहे ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीतील एकुण वार्षीक वेतनाच्या ८.३३ टक्के इतके सानुग्रह अनुदान मंजुर करण्यात येत असल्याचे विधी व न्याय विभागाने आज कळविले आहे, असे श्री.मुगळीकर यांनी सांगितले.
श्री साईबाबा संस्थानच्या कर्मचा-यांना दिपावली निमित्ताने सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेवुन राज्यशासनाची मान्यता मिळणेसाठी प्रयत्न केल्याबद्दल शासनाचे तसेच संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, सर्व विश्वस्त, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व सर्व प्रशासकीय अधिकारी यांचे संस्थान कर्मचा-यांनी आभार मानले आहे.