Languages

   Download App

News

News

श्री पुण्‍यतिथी उत्‍सव प्रथम दिवस

October 7th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेल्‍या १०१ वा पुण्‍यतिथी उत्‍सवास आज मंगलमय वातावरणात पहाटे श्रींच्‍या फोटो व पोथीच्‍या मिरवणूकीने सुरुवात झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाने प्रवेशव्‍दारावर उभारलेल्‍या “शिव महाव्‍दार” या देखाव्‍याने साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतले.

उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती झाली. त्‍यानंतर पहाटे ५.०० वाजता श्री साईबाबांच्‍या प्रतीमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पोथी, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ.प्रितम वडगावे यांनी विणा आणि लेखाधिकारी कैलास खराडे व विधी अधिकारी गोरक्षनाथ नलगे यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. या मिरवणूकीत विश्‍वस्‍त अॅड.मोहन जयकर, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, सौ.सरस्‍वती वाकचौरे व प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे हे सहभागी झाले होते. मिरवणूक व्‍दारकामाईत आल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणास प्रारंभ झाला. अधिक्षक पोपट निर्मळ यांनी प्रथम, अधिक्षक सतिष कासार यांनी व्दितिय, कृषी अधिकारी अनिल भणगे यांनी तृतिय, विभाग प्रमुख किशोर गवळी यांनी चौथ्‍या व विभाग प्रमुख अशोक वाळुंज यांनी पाचव्‍या अध्‍यायाचे वाचन केले.

सकाळी ६.०० वाजता समाधी मंदिरात संस्‍थानचे अधिक्षक विजय सिनकर यांच्‍या हस्‍ते श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती झाली, दुपारी ४.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्‍यास, डोंबिवली यांचे किर्तन झाले तर सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती झाली. रात्रौ.७.०० ते १०.०० यावेळेत पंडीत उदय मलिक, दिल्‍ली व यशश्री कउलसकर, पुणे यांचा भजन संध्‍या हा कार्यक्रम संपन्‍न झाला. या कार्यक्रमास श्रोत्‍यांनी उत्‍स्पुर्त प्रतिसाद दिला. रात्रौ ९.१५ वाजता गावातून पालखीची मिरवणूक काढण्‍यात आली. मिरवणूकीनंतर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती झाली. तर अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्‍यात आले. श्री पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त दिनांक ०७ ऑक्‍टोबर ते दिनांक १० ऑक्‍टोबर २०१९ या उत्‍सव कालावधीत सकाळी ७.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत लेंडीबागेजवळील गेट नंबर ५ च्‍या समोर साईभक्‍तांना मोफत विविध वृक्षांचे रोपे वाटप करण्‍यात येणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. संस्‍थानचे माजी अध्‍यक्ष श्री.द.म.सुकथनकर हे श्रींच्‍या माध्‍यान्‍ह आरती करीता उपस्थित होते.

उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी मंगळवार दिनांक ०८ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती व श्रींच्‍या फोटोची आणि पोथीची मिरवणूक, पहाटे ५.२० वाजता श्रींचे मंगल स्‍नान व नंतर दर्शन, सकाळी ६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी ९.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्‍यास, डोंबिवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होवून सकाळी १०.३० वाजता समाधी मंदिराचे समोरील मुख दर्शन हॉल स्‍टेजवर आराधना विधी कार्यक्रम व दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद तर सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन व मिरवणूक कार्यक्रम, सायंकाळी ६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ.७.०० ते १०.०० यावेळेत पंडीत सुगाटो भादुरी, कलकत्‍ता यांचा क्‍लासिकल मंडोलिन आणि भजन कार्यक्रम होणार असून रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. उत्‍सवाचा हा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तर रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० यावेळेत श्रींचे समोर कलाकारांची हजेरी कार्यक्रम होईल.

Recent News