Languages

   Download App

Accomodations

Accomodations

कोल्‍हापूर व सांगली जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांना वैद्यकीय मदतीसाठी २० जणांचे वैद्यकीय पथक औषधांसह रवाना

August 14th, 2019

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील कोल्‍हापूर व सांगली जिल्‍ह्यातील पुरग्रस्‍तांना वैद्यकीय मदतीसाठी आज सकाळी ०७.०० वाजता २० जणांचे वैद्यकीय पथक औषधांसह रवाना करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.

यावेळी संस्‍थानच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे, वैद्यकीय प्रशासक डॉ.प्रितम वडगावे, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, वाहन विभाग प्रमुख प्रकाश क्षिरसागर, रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री.मुगळीकर म्‍हणाले, पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापुर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यात महापुराच्‍या थैमानामुळे जनजीवन विस्‍कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गांवेही पूरामुळे बाधीत झालेली आहेत. तसेच या पुरात अनेक जनावरे मृत झालेली आहे. अनेक ठिकाणी दुषीत पाणी व गाळ साठल्‍यामुळे मोठया प्रमाणात रोगराईचे संभाव्‍य संकट निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. ही परिस्थिती आटोक्‍यात आणण्‍याकरीता राज्‍य शासनाकडुन व अशासकीय सामाजिक संस्‍थांकडुन तात्‍काळ मदत करण्‍यात येत आहे. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने पुरग्रस्‍थांच्‍या वैद्यकीय मदतीसाठी एक फिरते वैद्यकीय पथक वाहन (अॅम्‍ब्‍युलन्‍स) व एक बस सोबत २० जणांचे वैद्यकीय पथक आज सकाळी ०७.०० वाजता शिर्डीहुन रवाना करण्‍यात आले असून सोबत सुमारे १० लाख रुपयांची आवश्‍यक औषधे ही पाठविण्‍यात आलेली आहेत.

यापुर्वी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व विश्‍वस्‍त मंडळाने पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍याचा निर्णय घेतला असून त्‍यास मा.उच्‍च न्‍यायालयाने परवानगी दिलेली आहे. याबरोबरच जिल्‍हाधिकारी कोल्‍हापूर व सांगली यांना पुरग्रस्‍तांच्‍या प्रकृतीला होणारा संभाव्‍य अपाय टाळण्‍यासाठी पूरग्रस्‍त जिल्‍ह्यांमध्‍ये निर्जंतुकीकरण करणे तसेच शुध्‍दीकरण करणे याकामी रासायनीक द्रव्‍ये इत्‍यादीचा वापर करणे, फवारणी करणे इत्‍यादी कामांसाठी प्रत्‍येकी ०१ कोटी रुपयांचा अतिरिक्‍त निधी थेट देण्‍याचे आदेश मा.उच्‍च न्‍यायालयाने दिले असल्‍याचे ही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

Recent News