श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यातून पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्रीसाईनामाच्या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली.
आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे काकड आरतीनंतर साईबाबांच्या फोटोची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्दारकामाई पर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकीत विश्वस्त अॅड.मोहन जयकर, सौ.स्मिता जयकर व सौ.सरस्वती वाकचौरे हे सहभागी झाले होते. तर संस्थानचे प्रशासकीय अधिकारी अशोक औटी व सामान्य प्रशासन विभागाचे अधिक्षक विश्वनाथ बजाज यांनी श्रींची प्रतिमा, मंदिर विभागाचे पर्यवेक्षक संजय कुंभार यांनी विणा व आय.टी.आयचे प्राचार्य शिवलिंग पटणे यांनी पोथी घेवून मिरवणूकीत सहभाग घेतला. या प्रसंगी सर्व विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाईत गेल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय रोहमारे यांनी पहिला, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी दुस-या अध्याय, सभाकामकाज अधिक्षक नवनाथ कोते यांनी तृतीय, प्रसादालय अधिक्षक विष्णु थोरात यांनी चौथा व उपकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी पाचव्या अध्यायाचे वाचन केले.
सकाळी ६.१५ वाजता प्रशासकीय अधिकारी सुर्यभान गमे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.शोभाताई गमे यांनी श्रींची विधीवत पाद्यपूजा केली. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. यावेळी विश्वस्त बिपीनदादा कोल्हे उपस्थित होते. दुपारी ४.०० वा. समाधी मंदिराशेजारील स्टेजवर ह.भ.प.श्री.विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन झाले. सायंकाळी ६.३० वाजता श्रींची धुपारती होवून सायं.७.३० ते रात्रौ १०.१५ यावेळेत श्री.निनाद आजगांवकर, मुंबई यांचा गीतरामायण हा कार्यक्रम झाला. रात्रौ. ९.१५ वाजता श्रींची गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली.
आज उत्सवाचा प्रथम दिवस असल्याने व्दारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले. संस्थान प्रशासनाने संभाव्य गर्दीचे नियोजन केलेले असल्यामुळे सर्व साईभक्तांना सुखकर व सुलभतेने बाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. उन्हाची तीव्रता लक्षात घेवून संस्थान प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवली. मंदिर परिसरात व्दारकामाई मंडळ, मुंबई यांनी उभारलेला श्री साईसच्चरित या ग्रंथातील अध्याय क्रमांक ५ मधील प्रसंगावर अधारित साई समर्थ हा भव्य देखावा व विद्युत रोषणाई पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. तसेच गुजरात मधील भरूच येथील श्री साईराम गुरुजी यांनी भरूच ते शिर्डी हे ५६० कि.मी. अंतर १४ दिवसांत उलट पाउली चालून पूर्ण करून आज त्यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. श्री साईराम गुरुजी हे भरूच येथे आश्रमात राहत असून वर्षातून चार वेळा श्री रामनवमी, गुरुपौर्णिमा, विजयादशमी व श्री दत्त जयंती याउत्सवात उलट पाउली चालत येऊन ते श्री साई समाधीचे दर्शन घेत आहेत. त्यांचे हे ४४ वे वर्ष आहे.
उद्या दिनांक १३ एप्रिल रोजी उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड परायणाची समाप्ती होवून श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. पहाटे ५.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्नान होईल. सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर ह.भ.प.श्री.विक्रम नांदेडकर यांचा श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ ७.३० ते १०.३० यावेळेत श्री.सुदेश भोसले, मुंबई यांचा भावगीत/भक्ती संगीत हा कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर होणार आहे. रात्रौ ११.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच उद्या उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील.
सदरचा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.