शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व स्वस्तिश्री परिवार, राहाता यांच्या वतीने व्दारावती भक्तनिवास समोरील बागेत २१ जुन जागतिक योग दिन म्हणुन साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाचा शुभारंभ संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, प्रशासकीय अधिकारी अशोक औटी, शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, अध्यापक, विद्यार्थी, संस्थान कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी योगाचार्य डॉ.तुषार शिसोदीया यांनी सर्वांना योग साधनेचे मार्गदर्शन करुन योगासने करुन घेतले. यामध्ये महिलांचा सहभाग मोठा होता.
याप्रसंगी श्री.मुगळीकर म्हणाले, दरवर्षी २१ जुन हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. योग साधनेमुळे आपले आरोग्य चांगले राहाते, प्रतिकार शक्ती वाढते तसेच बृध्दी सुक्ष्म होते. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये योग्य जीवन जगण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा योग साधनेमधुन मिळते. योगाचा अवलंब आपल्या जीवनात प्रत्येकाने जसा जमेल तसा केला पाहिजे. शाळेतील सर्व मुलांनी सुर्य नमस्काराबरोबर योगाचे विविध आसने केली पाहिजे. तसेच सर्व वयातील लोकांनी योगासन केले पाहिजेत. मात्र पन्नासीच्या वयातील लोकांनी आपले पुढील जीवन आरोग्यदायी व चांगले जाण्यासाठी योगाचा अवलंब केला पाहिजे, असे सांगुन सर्वांनी योग साधनेत सहभागी व्हावे असे आवाहन ही श्री.मुगळीकर यांनी केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन क्रिडा शिक्षक राजेंद्र कोहकडे यांनी केले.