शिर्डी, २० मे २०२५ – श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईनाथ नेत्रपेढीमध्ये आजवर ५ जणांनी मरणोत्तर नेत्रदान करून ६ दृष्टिहीनांना नवदृष्टी दिली आहे. यामध्ये आजची घटना विशेष ठरली – निमगाव (ता. राहाता) येथील गणेश जाधव (वय ३२) यांच्या नेत्रदानामुळे दोन रुग्णांना जीवनात नवा प्रकाश मिळणार आहे.
गणेश जाधव यांचे श्री साईनाथ रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊसाहेब, संतोष व पत्नी ज्योती यांनी संपूर्ण कुटुंबाच्या सहमतीने नेत्रदानाचा निर्णय घेतला. रुग्णालयातील डॉक्टर व नेत्रपेढी टीमने तत्परतेने प्रक्रिया पार पाडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले. “नेत्रदानातून मिळणारी दृष्टी ही मरणोत्तरही आयुष्याची देणगी असते,” असे ते म्हणाले.
नेत्रदानाच्या या प्रेरणादायी घटनेने समाजात जनजागृती घडावी, अशा आशयाचे आवाहन संस्थान व जाधव कुटुंबीयांनी केले आहे.