श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्यावतीने सुरत येथील साईभक्त श्री जिग्नेश सी. राजपूत यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नांतून साकार झालेल्या दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात श्री साईबाबांचे समकालीन भक्त, तसेच संस्थानमध्ये काळानुसार झालेल्या बदलांचे सुमारे २ हजार छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शन घडवले आहे.
हे भव्य प्रदर्शन श्री साई मंदिर परिसरात भरविण्यात आले असून, त्याचे उद्घाटन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, प्रभारी जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लोखंडे यांच्यासह अनेक साईभक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर छायाचित्र प्रदर्शन गुरुपौर्णिमा उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी खुलं राहणार असून, अधिकाधिक साईभक्त आणि ग्रामस्थांनी या अनोख्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गाडीलकर यांनी यावेळी केले.