श्री. साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी उतरला “डोक्यावरील गाठीचा डोंगर!”
अनिकेत भानुदास इंगळे, रा.चत्तरी ता-पातुर जि. अकोला येथील २१ वर्षीय तरुणाच्या डोक्यावर जन्मजात छोटी असलेली गाठ कालांतराने वाढत जावुन ४.९ किलो वजनाची झाली. डोक्यावर गाठीचा जणु डोंगरच झाला ही गाठ इतकी मोठी होती की ती दूरूनही सहज दिसत होती व रुग्णाच्या सामाजिक,मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तीव्र परिणाम करत होती. अनेक वर्षांपासून या गाठीसह जगणाऱ्या रुग्णाची ही अवस्था पाहून त्यांच्या जीवीत्वाला होणा-या संभाव्य धोका पाहुन कुठलेही डॉक्टर त्यांची शस्त्रक्रिया करणेस तयार नव्हते. यातुन माझी कशी सुटका होईल हाच एक प्रश्न रुग्णाला कायम सतावत होता यासाठी त्यांनी अनेक नामांकीत हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले. परंतु गाठ डोक्याला असल्याने जिवीत्वाची जबाबदारी कुणी घेणेस तयार नव्हते शेवटी कंटाळुन त्यांनी साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे धाव घेतली. येथे हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉ.अजिंक्य पानगव्हाणे यांनी त्यांची संपुर्ण तपासणी करुन त्यांचेवर शस्त्रक्रिया करणेचा धाडसी निर्णय घेतला व रुग्णांने व त्यांच्या नातेवाईकांनी संभाव्य धोका पत्करुन ही सहमती दर्शवली.
दि.२५ जुन रोजी ही जटिल शस्त्रक्रिया डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व भूलतज्ञ निहार जोशी व त्यांच्या सर्जरी विभागाच्या टीमने प्रयत्नांची पराकाष्टा करुन रुग्णांचे जिवीत्वाला कोणताही धोका न होवु देता इतक्या मोठया प्रमाणात वाढलेली ३० x २.५ से.मी. आकाराची व तब्बल ४.९ किलो वजनाची भलीमोठी संपुर्ण गाठ एकाच वेळेस पुर्णपणे काढली. अशा प्रकारची अवघड, गुंतागुंतीची व दुर्मिळ आजारावरची शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये प्रथमच सर्व टीमच्या प्रयत्नानमुळे यशस्वी पार पाडली आहे असे डॉ.अजिंक्य पानगव्हाणे यांनी यावेळी बोलताना सांगीतले तसेच श्री साईबाबा हॉस्पिटल हे केवळ श्रद्धेचे नव्हे तर आरोग्य सेवेतही चमत्कार घडवणारे केंद्र ठरत असुन रुग्ण पुर्णपणे बरा होवुन सुखरुप पणे घरी पोहचला आहे. यामुळे रुग्ण व त्यांचे कुंटुंबांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ही संपुर्ण शस्त्रक्रिया श्री साईबाबा हॉस्पिटलने पुर्णपणे मोफत केली असुन या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से) उप मुख्य कार्यकारी अधिकारी, भिमराज दराडे, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक, लेफ्ट कर्नल, डॉ.शैलेश ओक, (से.नि). उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, न्युरो सर्जन, डॉ.मुकुंद चौधरी, जनसंपर्क अधिकारी, सुरेश टोलमारे आदीनी डॉ.अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या संपुर्ण टीमचे अभिनंदन केले आहे.