Languages

   Download App

मंदिर परिसर

मंदिर परिसर

Gurusthan “असो बाबांच्या आज्ञेवरुन । पूवीर्प्रमाणे विटा लावून ।
भूयार टाकिले बंद करुन । बिज गुरुस्‍थान ते॥
अ. 4/135

श्रीसाईबाबा ज्या ठिकाणी¸प्रथम निंब वृक्षाखाली शिरडीत अवतीर्ण झाले त्या ठिकाणास गुरूस्थान म्हणतात. त्यावेळी त्याचे वय अवघे सोळा वर्षाचे होते हा निंबवृक्ष श्रीसाई समाधीमंदिराच्या अगदी पाठीमागेच आहे. ते जमिनीपासून एक फुट उंचीच्या चौरस अशा ओट्यावर उभारलेले आहे. हे मंदीर पश्चिमाभिमुख आहे. या मंदिराचा जिर्णोध्दार आश्विन शुध्द 10 शके 1863 म्हणजे 30-09-1941 मध्ये केला गेला. या गुरूस्थान मंदिरात एक लहानसे देऊळ आहे व त्या देऊळावर साजेसाच एक कळसही आहे. या देवळात एका उच्चासनावर श्रीबाबांची भव्य तसबीर ठेवण्यात आली आहे. या तसबीरी पुढेच शिवपिंडी असुन त्या पिंडीची शाळुंका उत्तरेकडे तोंड करून ठेवण्यात आली आहे. ही शंकराची पिंडी श्रीबाबांनी स्वहस्ते स्थापन केलेली आहे हे विषेश होय.या पिंडीच्या जवळच एक स्फटीकाचा नंदी आहे. या छोटेखानी मंदिराच्या बाहेरच्या अंगास लगतच बाबांची एक संगमरवरी छोटेखानी मूर्ती आहे. ती मुबंईचे एक साईभक्त¸श्री यशवंतराव दवे यांनी 1974 साली वेदमंत्रांच्या सोपस्कारासह प्रतिष्ठापित केली. छोटेखानी मंदिराच्या दक्षिण बाजुला निंबवृक्षाचा घसघशीत बंुधा आहे. या गुरूस्थान मंदिराच्या छपरातून वरच्या दिशेने हा वृक्ष फोफावला असून याच्या फांद्यांना उपफांद्या फुटलेल्या असुन हिरवीगार पाने आहेत. एरवी कडुनिंबाची पाने कडु लागतात पण ही पाने दाताखाली चावली तर ती गोडही लागतात ही सारी श्रीसाईबाबांची किमया आहे. अशी समस्त साईभक्तांची श्रध्दा आहे. या निंब वृक्षाचे संरक्षण व्हावे म्हणून यां मंदिराचे नुतिनिकरण करण्यात आले¸ आहे. या मंदिराचा उत्थापन दिन संस्थानमार्फत दिनांक 13 एप्रिल 2007 रोजी साजरा करण्यात आलेला असून निंबवृक्षाच्या पश्चिमबाजूस नविन मंदिर तयार करण्यात आले आहे.

गुरुस्थान शेजारीच (कै.) रावबहाद्दूर हरी विनायक साठे कलेक्टर अहमदनगर यांचा वाडा त्यावेळी होता. तो चोहोबाजुंनी माती व विटांनी बांधलेला होता. त्याला पुर्व व पश्चिम बाजुस दिंडी दरवाजे होते. या निंबवृक्षाच्या शेजारी वाड्यातील पुढील दरवाज्या जवळ जिन्याखाली एका कमानीत गावकऱ्यांनी खणून पाहीले. तो काय! आतमध्ये एक मोठाच चमत्कार दिसला. तिथे 10न्10 फुटाची एक खोली त्यांना दिसली. खोलीत पाट व बाजुला पेटत्या समया आणि पाटावर व्याघ्रमुखी कातडे व जपमाळ दिसली. आश्चर्य चकीत झालेल्या गावकऱ्यांनी या फकीराकडे म्हणजेच तरूण बाबांकडे नम्रतेने पाहीले व याचा उलगडा करण्याची त्यांना विनंती केली. तेव्हा ते म्हणाले, "ही माझ्या सदगुरूरायाची जागा आहे." आपला उजवा हात निंबवृक्षाच्या पुर्वाभिमुख असणाऱ्या फांदीवर ठेवून बाबा म्हणाले " आजपासून झाडाच्या पानांचा कडवटपणा निघुन जाईल आणि जो कुणी गुरूवार व शुक्रवारी याठिकाणी सारवून ऊद जाळील त्याचे कल्याण होईल". नंतर खणलेली जागा गावकऱ्यांनी कायमची बंद केली. बाबांच्या निर्वाणानंतर¸ तत्कालीन संस्थान कमिटीने त्या जागी एक लहानसे मंदीर बांधले. हेच मंदीर आज गुरूस्थान म्हणून ओळखले जाते.

Gurusthan इ.स. 1912 मध्ये डॉ. रामराव कोठारे यांनी बाबांसाठी मुंबईहून पादूका करून पाठविल्या उपासनी महाराजांनी त्यांची शुध्दी करून त्यांवर इतर पवित्र संस्कार केले. नंतर कमलाकर दिक्षित यांनी खंडोबाच्या देवळातून त्या पादुका डोक्यावर घेऊन बाबांच्या जवळ नेल्या. श्री बाबांनी त्यांना करस्पर्श केला आणि 'हे सच्चिदानंद परमेश्वराचे पाय आहेत. त्यांना पवित्र निंबवृक्षाखाली स्थान द्या.' असा आदेश दिला. त्यानुसार श्रावण मासातील पौणिर्मेला त्या पादुकांची स्थापना निंबवृक्षाखाली - गुरूस्थानी करण्यात आली.

Samadhi Mandirऐसी गेली वर्षे बहुमोल । आसा खड्याचा उदयकाळ
उठाला सभोवती वाडा विशाल। या दीनदयाळा साईचा॥
अंती त्याच खडयाचा गाभारा। आला विसावा साई शरीरा ।
तेथेच त्यांना अक्षय थारा। झाला उभारा समाधीचा ॥ (अ. 39)

बाबांचे निस्सीम भक्त श्रीमंत बापुसाहेब बुट्टी यांना सुमारे 1916 ते 1918 चे दरम्यान वाडा बांधण्याचा दृष्‍टांत झाला. तसाच दृष्‍टांत कै. माधवराव देशपांडे यांना झाला. त्याप्रमाणे श्री बाबांची परवानगी घेऊन त्या इमारतीचे काम श्रीसाईबाबांच्या खास देखरेखीखाली करण्यात आले. हाच तो बुट्टींचा वाडा, अर्थात समाधी मंदीर.

आज श्रीसाईबाबांचे समाधी मंदीर म्हणून जी वास्तू भक्तांना दिसून येते ती पूर्वी म्हणजे बाबांच्या हयातीत एक दगडी वाडा होता. नागपुरचे लक्षाधिश सावकार व प्रख्यात साईभक्त श्रीमंत गोपाळराव उर्फ बापूसाहेब बुट्टी यांचा वाडा होय. बापूसाहेबांना येथे श्रीमुरलीधराचे मंदिर बांधावयाचे होते. बाबांना विचारून त्यांनी वाडयाचे मंदीररूपी बांधकामास आरंभ केला.

बाबा चावडी वरून लेंडी बागेत जातांना या मंदिरावरून जात असत व जाता येता या मंदिराचे सुरू असलेले बांधकाम पहात असत. मंदिराचे बांधकाम अगदी डोळ्यात भरण्याजोगे झालेले असतांना ते एकदा आपल्या निकटभक्त माधवराव देशपांडे उर्फ शामा यांना म्हणाले"अरे, आपण आता येथे रहायला येऊ या, नाचू या, खेळु या बागडू या" तेव्हा साक्षात बाबांनाच द्वारकामाई लगतच्या या होणाऱ्या मंदिराचे आकर्षण वाटत होते. या मंदिरात कायमचे वास्तव्य करण्याची त्यांनीच आशा¸ प्रगट केली होती.

ही वास्तू दुमजली असून तीसऱ्या मजल्यावर चुन्याची गच्ची केलेली आहे. इमारतीत खाली व वर पुष्कळ खोल्या असून खाली सभामंडपाचा समावेश व वर प्रशस्त असे दिवानखाणे आहेत. श्रीमंत बुट्टी हे नागपूर येथील होते व ते भोसलेंचे सावकार होते. त्यांनी स्वत: राहाण्यासाठी ही इमारत बांधली होती.

श्री साईबाबांनी सन 1918 साली देहत्याग केल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीत बांधल्या गेलेल्या इमारती किंवा इतर स्थावर जंगमची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी स्वीकारणे अत्यंत इष्ट होते. या करीता 1923 साली श्री साईबाबा संस्थान ट्रस्टची स्थापना झाली. ¸

मिती आश्विन शुध्द 10 मंगळवार, दि. 15 आक्टो. 1918 शके 1840 रोजी विजयादशमीस दुपारी 2 वाजुन 35 मिनिटांनी बाबांनी आपले अवतार कार्य संपवून आपल्या देहाचा त्याग केला. देहत्यागापूर्वी काही वेळ अगोदर भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ रूपये दक्षिणा भेट म्हणून दिल्यावर बाबा क्षीण आवाजात म्हणाले होते¸ "अरे मला इथ बरं वाटत नाही, आता मला वाडयात (मंदिरात) घेऊन चला." हेच बाबाचे अंतिम उद्गार होते. या घटनेपूर्वी काही दिवस अगोदर बाबा प्रत्यक्ष त्या मंदिरात गेले होते. त्यावेळी आज जेथे समाधी आहे त्याच जागी हाताच्या बोटांनी त्यांनी एक काटकोन चौकोन काढला व ते म्हणाले "अरे, शाम्या हीच जागा चांगली आहे. इथेच रहायला यावेसे वाटते हं!"

बुधवार दि. 16 आक्टो. 1918 रोजी गावातूंन मिरवणूकीने बाबांचा देह बुटी वाडयात आणला. (आजचे समाधी मंदीर).

बाबांची व्दारकामाईतील फुटलेली वीट समाधितही बाबांच्या उशाखाली ठेवण्यात आली आहे.

मागच्या बाजुस समाधिस स्नान घालण्याकरीता पाणी तापविण्याची जागा व स्नानाकरिता न्हानीगृह केलेले आहे.

समाधी - मंदीर दुमजली असून दर्शनी भागास मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर चार खांब व तीन नक्षीदार कमानींनी युक्त असा सज्जा (बाल्कनी) आहे. मंदिराच्या प्रवेशव्दाराशी अगदी मध्यावर, श्री साईबाबांच्या पुतळ्यासन्मुख, एका 1॥-2 फूट उंचीच्या चबुतऱ्यावर स्फटीकाचा नंदी विराजमान झालेला दिसतो.

मंदीराचा एकुण विस्तार तीन स्पष्ट विभागांत विखुरलेला आहे. 1) बाहेरील भव्य सभा-मंडप 2) मध्य-मंडप अथवा रंग-मंडप व 3) गर्भागार असे ते विभाग आहेत. बाहेरील सभा-मंडपात पाचशे ते सहाशे लोक एकावेळी ह्या दरबारात बसू शकतात. मंदिराचा हा भाग इ.स. 1949 ते 1951 ह्या काळात बांधण्यात आला. श्री. रासने, (नगर) चिंचणीकर व गालवणकर या तीघांनी ही जागा संस्थानला देणगी म्हणून दिली. व या जागेवर 65000 रू. खर्चून हा सभा-मंडप बांधण्यात आला. समाधी मंदिरात बाबांच्या वेळेच्या भक्तांच्या छबी लावलेल्या आहेत.

मंदिराचा कळस

1952 साली विजयादशमी ता. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता समाधिमंदीरावर सोन्याचा कळस बसविण्याचे कार्य विद्वतरत्न डॉ. श्री. रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर महाराज (इंदोर) यांचे शुभहस्तें यथायोग्य विधिपूर्वक पूर्ण करण्यात आले. त्यावेळचा सोहळा अपूर्व होता. हिंदूस्थानच्या कानाकोंपऱ्यापासून असंख्य भक्तगण हा सुखसोहळा अनुभवण्याकरीता जमा झाले होते. साईमंदीराचे कळसाला दिनांक¸27 जुलै, 2007 रोजी सोन्याचा मूलामा देण्यात आलेला आहे. (श्री गुरूपौर्णिमा या दिवशी साईभक्त श्री बी. विजयकूमार, हैद्राबाद यांचेमार्फत - एकूण रूपये - 33,46,200 मात्र. )

सभामंडप

बाबांच्या समाधिमंदीरा पुढील जागा सद्भक्त श्री दामुआण्णा रासने नगरकर यांनी सभामंडपाकरीता विकत घेऊन संस्थानास बक्षिस दिली. पण मंदीराच्या मानाने ही जागा फारच अपुरी पडे. या करीता त्रैवाषिर्क काळांत त्याच जागेस लागून असलेली श्री. गोंदकर यांची जागा संस्थान कमिटीने चिंचणकर मिळकतीच्या उत्पन्नाच्या रकमेतून पैसे खर्च करून ( रू. 960) विकत घेतली. तसेच त्या जागेस लागून असलेली श्री. पुनमचंद शेट मारवाडी यांची जागा रावसाहेब, श्री. यशवंत जनार्दन घाळवणकर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस खाते, मुंबई. सेक्रेटरीएट राहणार अर्नाळे यांनी विकत घेऊन ( एकुण खर्च 750 रू.) संस्थानास बक्षिस दिली.

गर्भागार

आतल्या ह्या भागाला गर्भागार म्हणणे तितकेसे बरोबर होणार नाही. कारण चारी बाजूंनी तो मोकळा व उंच असून एखाद्या मोठा दालनासारखा दिसतो. ह्या ठीकाणी श्री बाबांचा पार्थीव देह समाधीत चिर-शांती घेत पहुडला आहे.

मिती आश्विनशुध्द 10 दि. 15-10-1918 ला विजयादशमी च्या दुपारी अडीच-पावणेतीनच्या सुमारास बाबांनी आपले अवतार कार्य संपवून देहाचा त्याग केला. देहत्यागापूर्वी काही काळ लक्ष्मीबाई शिंदे यांना नऊ रूपये दिल्यानंतरच बाबा म्हणाले होते, 'अरे! मला इथं बरं वाटत नाही. वाडांत घेऊन चला,' तत्पूर्वी शामाच्या म्हणण्यावरून ते मंदिराचे बांधकाम पाहावयास गेले. त्या वेळी त्याच जागी हाताच्या बोटांनी त्यांनी एक काटकोन-चौकोन काढला व ते म्हणाले 'अरे शाम्या ही जागा चांगली आहे. इथेच राहयला यावेसे वाटते.' त्यांच्या इच्छे नुसार त्यांच्या (श्री. बाबांच्या) पाथिर्व देहाला त्याच जागी समाधी देण्यात आली.

समाधी संगमरवरी प्रस्तराच्छादित असून भोवती तीन फूट उंचीचा व अंदाजे नऊ फूट लांबी-रूंदीचा चौथरा आहे. प्रत्यक्ष समाधीची लांबी 6.2" व रूंदी 2.1" असून ती चौथऱ्याच्या मध्यावर दक्षिणोत्तर अशी आहे. समाधीतील बाबांचे डोके उत्तरेकडे व पाय दक्षिणेकडे आहेत.पायथ्याकडे समाधी समोर कमल-दलांवरच्या संगमरवरी पादूका आहेत. बाबांची ती सुप्रसिध्द वीट समाधीतही बाबांच्या उशाखाली ठेवण्यात आलेली आहे.

समाधी मंदिरात प्रथमच सन 1986 मध्ये श्रींच्या मूर्तीस सिंहासन तयार करण्यात आले. दि. 28-09-1986 च्या व्यवस्थापन मंडळाचे निर्णयानुसार चांदीचे काम मे. पी.आर.वैशंपायन अँन्ड सन्स, नाशिक यांचे कडून घेणेत आले.ते खालील प्रमाणे:-

1) दोन सिंह 2)12 खांब त्यावरील नक्षीकाम 3) प्रभावळ 4)सिंहासन¸5) श्रींचे पायाजवळील सिंहासना जवळील भाग 6) समाधी पाठीमागाील उघडा भाग 7) रेलींग (कठडा) इत्यादि कामे नविन करण्यात आली त्याचा एकूण खर्च रूपये 8,50,723/63 इतका आला होता. त्यानंतर श्रींचे मूर्तीचे पाठीमागील भिंतीवरील चांदीचे नक्षीकाम व समोरील दोन पूर्ण खांब दि. 08-05-1999 रोजीच्या सभेत मा.व्यवस्थापन मंडळाने मे.टकले बंधू सराफ, नाशिक यांचे मार्फत मजुरी दराने दि. 02-09-1999 अखेर करवून घेतले. मुर्ती मागील भिंतीची चांदी-वजन 142.743 कीलो -चांदीची किंमत 12,14,965.60/-
मजुरी रक्कम रूपये-5,85,847/-

दोन पुर्ण खांब व दोन अर्ध खांब-123.703 कीलो -चांदीची कींमत 10,52,905.50/-
मजुरी रक्कम रूपये-5,07,703/-

सोन्याच्या पादूका - श्री साईभक्त विजयकूमार हैद्राबाद यांनी दिनांक 21 जून, 2006 रोजी रूपये- 33,62,418/- मात्र या रकमेचे तीन किलो पाचशे ग्रम सोन्याच्या पादूका अर्पण केल्या सदर पादूका मूळच्या चांदीच्या पादुकावर ठेवण्यात आल्या आहेत.

सोन्याचे सिंहासन - सन 2007 मध्ये श्री चे सिहासनाचे सुर्वणीकरण करण्यात आले. दिनांक 19 डिसेंबर 2007 रोजी श्री साईभक्त आदिनारायण रेडडी यांनी दान दिले. पुढीलप्रमाणे - दोन सिंह, सोन्याची प्रभावळ, सोन्याच्या बैठका दोन, सौन्याची एक छत्री, सभोवतालची सोन्याची एक पटटी आणि श्री चे मुर्तिचे पाठीमागील सोन्याचे काम.

श्रींची मुर्ती

Samadhi Mandir बाबांची ही जगप्रसिध्द मूर्ती इटालीयन कराका मार्बलची बनविण्यात आली. हा कराका मार्बल 'ए' ग्रेडचा संगमरवर म्हणून प्रसिध्द आहे. या मुर्तीला तयार करण्यासाठी त्यावेळी 22 हजार रू. खर्च आला. या जगप्रसिध्द मूर्तीचे शिल्पकार श्री भाऊसाहेब तालीम. मंुबई हे होत. मुर्ती तयार करण्यास 7 महिन्यांचा अवधी लागला.

गुरूवार 7 आक्टो. 1954 रोजी (विजयादशमी) शिरडीच्या समाधिमंदीरात ही मुर्ती अहमदाबादचे साईभक्त "श्री. साई शरणानंद " पुर्वाश्रमीचे श्री वामनभाई प्राणलालजी पटेल, बी.ए., एल. एल. बी, सॉलीसीटर यांचे शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रतिष्ठापीत करण्यात आली.

पालखी

प्रत्येक गुरूवारी श्री बाबांची पालखी निघते. रात्रौ 9.00 वाजता समाधी मंदीरात भजनाचा कार्यक्रम होऊन लगेचच 9.15 वाजता ही मिरवणूक निघते. बाबांच्या चर्मपादूका, सटका व बाबांची तसबीर समाधी-मंदिरातून द्वारकामाईत नेण्यात येऊन तेथील बाबांच्या बसावयाच्या शिळेवर बाबांची तसबीर आणून ठेवतात. द्वारकामाईत भजनांचा कार्यक्रम सुरू होते. हे भजन सुरू असता बाबांच्या तसबिरी बरोबर दोन्ही बाजूंनी चवऱ्या ढाळण्यात येतात. भजन संपले की, बाबांच्या चर्मपादूका, सटका व बाबांची तसबिर पालखीत ठेवण्यात येऊन पालखी उचलण्यात येते व वाजत-गाजत चावडीकेडे नेण्यात येते. तेथे बाहेर ठेवण्यात आलेल्या लाकडी पलंगावर ठेवण्यात येते. ह्याच लाकडी पलंगावर श्री बाबांना अखेरचे स्नान घालण्यात आले होते. तसबीर पालखीतून काढून जागेवर ठेवण्यात येते. बाबांच्या तोंडाला चिलीम लावण्यात येते व नंतर आरती होऊन पादूकांसह पालखी समाधी मंदिरात परतते¸तोवर रात्रीचे दहा वाजतात व शेजारती सुरु होते.

Dwarkamaiमोठी कृपाळू ही मशीदमाई । भोळ्या भाविकांची ही आई ।
कोणी कसाही पडो अपायी । करील ही ठायीच रक्षणा ॥

श्रीसाई व त्यांचे निकट भक्तमंडळी यांचा सुसंवाद याच (द्वारकामाई) वास्तूने ऐकलेला आहे. असंख्य व्याधिग्रस्तांच्या पीडा आणि विकार याच इमारतीत आल्याने कायम दूर झाले आहेत. अनेकांना जीवनाचे मार्गदर्शन येथुनच झाले आहे. निकटभक्त (कै.) नानासाहेब चांदोरकर यांना गीतेचे पाठ बाबांनी येथेच दिले. तर पैगंबर वासी अब्दुलबाबांना कुराणाचे धडेही त्यांनी येथेच दिले. मिती अश्विन शुध्द 10 मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबर 1918 शके 1840 रोजी विजयादशमीस दुपारी 2 वाजून 35 मिनीटांनी बाबांनी आपल्या देहाचा त्याग याच इमारतीत केला. देहत्यागापूर्वी काही वेळ अगोदर भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांना नवविधाभक्ती सूचक नऊ रूपये भेट दिले. ते याच ठिकाणी. बाबा याच इमारतीत बसत असत व त्यांच्या समोर धुनी अहोरात्र पेटलेली असे. येथे बाबांची आरती होत असे व दुपारच्या आरती नंतर नैवेद्याचा काला करून तो ते सर्वांना वाटत असत. श्री बाबांच्या जीवनातील असंख्य घटना याच इमारतीने पाहिलेल्या असल्याने या व्दारकामाईला एक आगळेच महत्व प्राप्त झालेले आहे.

¸¸¸ व्दारकामाईतील रथाचा तबेला व पालखीची खोली यांच्या मधल्या भागाला साक्षात् व्दारकामाई म्हणतात. व्दारकामाईच्या चार पायऱ्या चढून वरती गेले की, उजव्या हातास एक दगडी चौरंग दिसून येतो. बाबा आंघोळीसाठी या दगडी चौरंगाचा उपयोग करीत असत या चौरंगाशेजारीच एक लाकडी नक्षिदार देव्हाऱ्यात श्री साईनाथांचे एक जंगी तैलचित्र 4 फुट उंच व 3 फुट 2 इंच रुंद चांदीने मढविलेल्या फ्रेममध्ये एका उच्चासनावर ठेवण्यात आलेले आहे. या देव्हाऱ्यासमोर कमळदलाने वेस्टीलेल्या संगमरवरी पादुका असून पादुकांच्या एका बाजुला तिजोरीवजा दक्षिणापेटी व दुसऱ्या बाजुला लाकडी कठडा आहे. या कठड्याला टेकून व कठड्यावर एक हात ठेवून बाबा बसत असत. चांदीचे फ्रेममधले बाबांचे तैलचित्र मुबंई येथे राहणारे परमभक्त श्री. श्यामराव रामचंद्र जयकर यांनी सन 1917 साली बाबांना स्वत: विनंती करुन बाबांना आपल्या पुढ्यात बसवून चितारलेले आहे.

श्रीसाईनाथांचे हयातीतील योगलीला व चमत्कार या व्दारकामाईत घडलेले आहेत. व्दारकामाईस मशिद किंवा व्दारावती असे पण म्हणतात. श्री बाबा राहत असलेली व्दारकावती अगदीच मोडकळीस आलेली होती. तिचा जीर्णोध्दार करण्याचे श्री. नानासाहेब चांदोरकर यांनी ठरविले. श्री बाबांची अनुज्ञाही घेण्यात आली व हे काम त्यांनी श्री नानासाहेब निमोणकर यांच्यावर सोपविले. प्रथम बाबा संमतीच देत नव्हते ती म्हाळसापतींनी मिळविली. मग जुनी इमारत पाडून नवे बांधकाम सुरू करण्यात आले. पण बाबा त्यांत वारंवार अडचणी निर्माण करीत. कधी दगड-विटा-चुना फेकून देत तर कधी झालेले बांधकामच पाडून टाकीत. याचे कारण त्यांना टोलेजंग व संपूर्ण नवी इमारत नको होती. जुनी इमारत होती तशीच इमारत सुधारून हवी होती. शेवटी बाबांच्या इच्छेप्रमाणे बांणकाम पूर्ण करण्यात आले. व्दारकामाई इमारतीचे बांधकामासाठी श्री. कोंडाजी सुतार, श्री गबाजी व श्री तुकाराम सुतार या तीन भावांनी खूपच परीश्रम घेतले. सन 1912 साली द्वारकामाईत प्रथम फरशी बसविली.

इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले त्या वेळी बाबा निमगावास गेले होते. तेथून वाजत-गाजत बाबांना शिरडीस आणण्यात आले व सुमुहूर्तावर त्यांची एखाद्या देवतेप्रमाणे नव्या वास्तूत प्रतिष्ठापना करण्यात आली.

¸पुढे 1951 साली संस्थान कमिटीने व्दारकामाईची परत सुधारणा करून घेतली.

व्दारकामाई ही मशिद असल्याचे सांगितले जाते. श्री बाबा ज्यावेळी प्रथम शिरडीत आले त्यावेळी त्यांच्या बाह्यवेषावरून ते मुसलमान असावेत असा समज होऊन म्हाळसापती व त्यांचे स्नेही काशीराम शिंपी व अप्पा जागले यांनी त्यांना ह्या मशिदीत आणून बसविले. त्यावेळेपासून तो अंत:काळ पर्यंत¸ बाबा द्वारकामाईतच वास करून होते. श्री बाबा ह्या मशिदीला चुकूनही 'मशिद' म्हणत नसत. तिचा ते बहुतेक वेळा द्वारका, द्वारकावती, द्वारकामाई असाच उल्लेख करीत व क्वचित प्रसंगी ते 'मशिदमाई' म्हणून संबोधन करीत.

श्री बाबा पुढे पुढे दिवसाआड चावडीत झोपावयास जात असत. हा चावडीत जाण्याचा कार्यक्रम घोडा, पालखी छत्रीदार-चोपदार ,पताका, फटाके, भजनी मंडळी अशा थाटात व वाजत्र्यांच्या गजरात पार पडत असे. ह्या साऱ्या लवाजम्या बरोबर श्री बाबा पायी जात. ते घोड्यावर वा पालखीत बसले नाहीत. बाबांची आरतीही द्वारकामाईत होऊ लागली व त्यावेळी चवऱ्या छत्र-चामरे बाबांवर ढाळु लागली. चावडीतही रात्री शेजारती व पहाटे काकड आरती सुरू झाली.

ह्या द्वारकामाईत श्री बाबांच्या पुजेचा पहिला मान म्हाळसापतींना लाभला. तत्पुर्वी ते स्वत:ची पुजा करवून घेत नसत. निंमगावचे श्री सिताराम डेंगळे यांना दुसरी पुजा करण्याची अनुज्ञा मिळाली. त्यानंतर काही दिवसांनी श्री नानासाहेब चांदोरकर यांचा धाकटा मुलगा महादेव तथा बापु याचेकडून बाबांनी आपली पुजा करून घेतली. यानंतर मग सर्वांनाच पुजा करण्यास बाबांनी मोकळीक दिली.

बैठकीची शिळा

ह्या व्दारावतीच्या मंडपाचे प्रवेशव्दार दक्षिणामूखी असले तरी मुख्य व्दारकावती मात्र पुर्वाभिमुख आहे. दारातून प्रवेश करताच उजव्या हाताच्या भिंतीच्या मध्यावर अंदाजे दहा फूट उंचीची चौखांबी देवळी आढळेल. त्याठिकाणी जो मोठा खडबडीत दगड आहेत्यावर श्री बाबा नित्य बसत असत. त्यावर मध्यभागी आता चांदीच्या पादुका बसविण्यात आलेल्या आहेत. ह्या पाषाणापासून वीतभर उंचीवर पूर्वभिंतीवर श्रीबाबांचा उजवा पाय खाली सोडलेल्या डाव्या पायाच्या मांडीवर ठेवलेल्या स्थितीतील 6' न् 4' फूट आकाराची भव्य तसबीर बसविण्यात आलेली आहे.

ह्या देवळीच्या सन्निधच एका तीन फुटी उंचीच्या चबुतऱ्यावर एक वाघाचा पुतळा बसविलेला दिसतो.एका दरवेशाच्या पिसाळलेल्या वाघाला ह्याच ठिकाणी बाबांशी दृष्टादृष्ट होताच मुक्ती मिळाली . त्याचे हे स्मृति-चिन्ह!. हा पुतळा श्री. त्र्यंबकराव श्रीपतराव शिलेदार यांनी दि. 12-11-1969 साली अर्पण केलेला आहे.

'श्रीं' चा रथ

व्दारकामाईत पालखी ठेवण्याच्या अगदी विरुध्द बाजूस एक लाकडी दार असलेला तबेला आहे. त्यात 'श्रीं' चा लाकडी रथ ठेवलेला आहे. त्या रथाच्या चारही बाजूस चार कळस असून मध्ये उंच डोलारा आहे. उत्सव प्रसंगी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत त्या रथाचा उपयोग केला जातो. हा रथ इंदुरचे श्री. अवस्थि काका व श्री¸ रेगे यांनी बाबांना अर्पण केला. या रथातून बाबांच्या तस्बीरीची अगदी पहिली मिरवणूक 1918 सालच्या गुरूपोणिर्मा उत्सव प्रसंगी काढण्यात आली होती.

चुल

रथाच्या खोलीच्या समोरच बाबांच्या हयातीतील एक चुल आहे. तीन दगडाच्या चुलीवर हंडी ठेवुन बाबा भात व गोड भात शिजवित असत व तो प्रसाद म्हणून भक्तांना वाटत असत. हा भात बाबा हातात पळी, डाव या पैकी काहीही एक न घेता आपल्या उघड्या हातांनी अक्षरश: ढवळीत असत. बाबां उकळत्या¸ वरणाच्या हंडीत लाकडी पळी ऐवजी आपला हात घालून ते ढवळीत असत.

या चुली जवळच एक¸ खांब आहे. त्याला खुंट असे म्हणतात. बाबा या खांबाला धरूनच उठ बस करीत. व्दारकामाईत दक्षिण व उत्तर भितीला पणत्याची कोनाडे आहेत. बाबा त्या कोनाड्यातुन पणत्या पेटवत असत.

धुनी

व्दारकामाईतील धुनी स्वत: बाबांनी आपल्या हातांनी त्या काळी¸ प्रज्वलीत केलेली असून ती आजतागायत अखंड पेटलेली आहे. इथून भक्तांना उदीची प्राप्ती होते. बाबां या धुनीतील विभूती 'उदी' म्हणून देत असत. ही बाबांची धुनी सात फुट लांब व 5 फुट 2" रूंदीची¸ आहे. दररोज दुपारच्या आरतीच्या पुर्वी या धुनीची पुजा केली जाते. या धुनीला लागून एक मातीचे भांडे (कोळंबा) आहे. बाबा गावातून भिक्षा मागून आणत. ती या कोळंब्यात ठेवली जाई, नंतर भक्तांना प्रसाद रुपाने वाटीत. व्दारकामाईत नैवद्य दाखवितांंना या कोळंब्यात पोळी-भाकरीचा तुकडा व किंचीतसा भात टाकण्याची प्रथा आहे.

जाते-पोते

देव्हाऱ्याच्या जवळच एक काचेचे कपाट आहे व त्यात सोळा पायली गव्हाने भरलेले पोते आहे. दर रामनवमीस या पोत्यातील गहु बदलण्यात येतो व त्याच्या पिठाचा प्रसाद तयार केला जातो. या काचेच्या कपाटाजवळच एका कोपऱ्यात खुंट्यासहित एक दगडी जाते आहे. स्वत: बाबा त्या जात्यावर गहु दळत असत. एकदा शिर्डीत महामारीची साथ आली होती. त्या साथीत सात माणसे दगावली. ज्या वर्षी ही साथ आली त्या वर्षी बाबांनी पोत्यातील गहु सुपात काढुन ते स्वत: दळायला सुरूवात¸ केली. त्या दळलेल्या गव्हाचे पीठ बाबांनी¸वेशीबाहेर शिवाचा ओढा होता तेथे नेऊन टाकायला सांगितले व त्याप्रमाणे करताच महामारी थांबली. अशी या जात्याच्या मागे घटना आहे.

Chavadi शिर्डीतील मुख्य समाधी मंदिराचे पुर्वेस मंदीरापासून जेमतेम 100 एक पावलावर ही वास्तु आहे. विशेषत:¸ द्वारकामाईपासून पुर्वेस जवळच हे स्थान आहे. श्री साईबाबा आपल्या हयातीत एका दिवसाआड येथे निद्रासुख अनुभवित असत. शिर्डीत श्रींच्या वास्तव्याने पुनित झालेली जी स्थाने आहेत त्यात श्री बाबांची चावडी हे एक महत्वाचे स्थान आहे.

चावडीच्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या व उजव्या अंगास पाच फुट रूंदीचा व सुमारे सोळा फुट लांबीचा ओटा असुन मागच्या भागात चावडीची मुख्य इमारत आहे. चावडीचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिणाभिमुख आहे. चावडीच्या प्रवेशद्वारावर लक्ष्मीबाई दामोदर बाबरे असे लिहीले आहे. एका लाकडी पार्टीशनने चावडीचे दोन भाग पडतात. उजवीकडील भागात पार्टीशनला लागून ओट्याकडील पहील्या दरवाजा समोर एक मोठा शानदार देव्हारा आहे. या देव्हाऱ्यात मऊ सुशोभित आसनावर श्री बाबांची बसलेल्या स्थितीतली एक भव्य तसबीर ठेवण्यात आलेली आहे.¸पार्टीशनच्या बाहेरच्या भागात पश्चिम भिंतीजवळ दोन रबरी चाकांची पांढऱ्या रंगाची एक खुर्ची व एक लाकडी पलंग ठेवण्यात आलेला आहे. ही खुर्ची एका भक्ताने बाबांना वृध्दापकाळात दिली होती. तेथे जवळच एक लाकडी पलंग आहे. बाबांना अखेरचे स्नान त्या पलंगावर घालण्यात आले होते.

पार्टीशनच्या ज्या भागात हे सारे आहे तिथे बाबा एक दिवसाआड झोपत असत. त्यावेळी अन्य कुणालाही चावडीत थांबण्याची किंवा त्यांचे बरोबर झोपण्याची अनुज्ञा नसे. तेथे बाबा झोपी जाण्यापूर्वी 64 वस्त्राच्या घड्या करून त्यावर झोपी जात असत. बाबा हे ब्रम्हचारी असल्याने या पार्टीशन पासुनच्या आतील भागात महिलांना येण्यास बंदी आहे. ही प्रथा पूर्वापार चालत आलेली आहे.

बाबा असतांना चावडीत बाबांची आरती होत असे. बाबा चिलीम प्यायले की,¸ सर्वांना उदीचा प्रसाद मिळे व सगळे भक्तगण आपापल्या बिऱ्हाडी जात. आजही पालखी दर गुरूवारी रात्री 9:30 वाजता व्दारकामाईतून निघुन चावडीत वाजत गाजत जाते. तिथे आरती व चिलीम शिलगावणे हा समारंभ झाल्यावर पालखी समाधीमंदिरात येते व तिथे शेजारती होते.

Lendi Gardens श्रीसाईबाबा समाधी मंदिरापासून विषेशत: गुरूस्थान पासून सुमारे पन्नास पावलांवर पश्चिमेकडे एक छानदार बाग आहे. या बागेला लेंडीबाग असे म्हणतात. या संपूर्ण बागेचा परीसर एक एकर जागेने व्यापलेला आहे. श्रीसाईबाबा द्वारकामाईतून निघून या बागेत रोज निदान तीन वेळा तरी जात असत. बाबांच्या वेळी येथे आंबे, तरवड, निंब, पिंपळ व औंदुंबर अशी झाडे होती. या झाडांना बाबा स्वत: घागरीने पाणी आणून घालीत असत. श्रीसाईबाबांच्या वेळी या बागेतून एक नाला वाहत जात होता, त्याचे नाव लेंडी. उन्हाळ्यात या नाल्याला फार थोडे पाणी असे. या बागेत बाबा एका अश्वत्थ (पिंपळ) झाडांच्या बुंध्याजवळ तास तास बसत असत. रोज सकाळी 9 वाजेच्या सुमारास भक्तमंडळी बाबांना लेंडीबागेपर्यंत वाजत गाजत नेत असत. तिथे गेल्यावर त्यांना या तपोवनात सोडीत व पुन्हा 11-12 वाजता भक्तमंडळी बाबांना द्वारकामाईत आणून सोडीत असत.

लेंडीबागेत असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली बाबा येऊन बसत. हा पिंपळ बाबांनी स्वहस्ते लावला. पिंपळाची एक शुष्क फांदी बाबांनी येथे रोवली तिलाच पालवी फुटून सध्याचा हा अश्वत्थवृक्ष बहरलेला आहे. या पिंपळाच्या झाडाजवळच निंबवृक्ष होता. या पिंपळ व निंबवृक्षाच्या बुंध्याशी बाबां लेंडीबागेत आले की, नित्य बसत. म्हणूनच की काय त्या जागेची स्मृती म्हणून तिथे एक सुंदरसे दीपगृह बांधलेले आहे. या दीपगृहात एक दगडी दिवा लावलेला असून तो सतत तेवत असतो. या दिव्याला 'नंदादीप' असे म्हणतात.

नंदादीप

नंदादीपाच्या अगदी समोर सुमारे 20 पावलांवर असलेल्या एका औंदुबरवृक्षाखाली भगवान् श्रीदत्तात्रयाचे एक सुंदर संगमरवरी मंदीर आहे. तीन शिरे सहा हात अशा थाटाची ही मूर्ती मनोहर असून मूर्तीच्या उजव्या हातास तिरप्या कोनात संगमरवराची गाय व डाव्या हातास श्वान मूर्ती आहे. मूर्तीच्या दोहो बाजूस काचेच्या उभ्या चौकोनी कपाटात नंदादीप तेवत असलेले दिसतात. लेंडीबागेतील ही दत्तमूर्ती 6-12-1976 रोजी दुपारी 11-05 ला प्रतिष्ठापीत करण्यात आली होती. या प्रसंगी साकोरी कन्या कुमारी उपासनी मठातील मुख्य आचार्य वेदशास्त्र संपन्न श्री वसंत शास्त्री देशमुख यांनी वेदमंत्र घोषात मूर्तीची प्रतिप्रतिष्ठा र्कैली.

श्रीदत्त मंदिराच्या मागील बाजूस एक समाधीस्थान आहे. ते म्हणजे¸बाबांच्या लाडक्या श्यामसुंदर घोड्याचे. हा अश्व बाबांचा अतिशय लाडका होता व खुद्द तो अश्व बाबांना पण फारच भजत असे. आरतीच्या नंतर तो दोन पाय जमिनिवर टेकून बाबांना नमस्कार करीत असे. बाबांच्या देहावसानंतर तो समाधीस्थानालाही नमस्कार करीत असे. 1945 साली हा घोडा मरण पावला. त्यास लेंडीबागेतील या जागी समाधी देण्यात आली आहे.

लेंडीबागेच्या या दुसऱ्या भागात अगदी पश्चिमेकडे एक विहीर आहे. ती बाबांनी भक्तांच्या सहाय्याने खोदली. या विहीरीला बाबा 'बुडखी' असे म्हणत. बाबा या विहीरीचे पाणी पिण्यास वापरत असत.

असे समजते कीं, बाबा लेंडीबागेत जात त्यावेळी ते एकटे असत. बागेच्या प्रवेशद्वारावरच बरोबरचे भक्त थांबत व बाबा एकांतात कांही तास घालवित असत. बागेतील लेंडी नाल्यात बाबा खिशातून चांदिची नाणी काढून फेकीत असत.

या बागेची जागा श्री मुरलीधर गोंदकर व श्री वामन मानकू गोंदकर यांचे मालकीची होती. बाबांचे मुंबई येथील भक्त रावबहादूर मोरेश्वर विश्वनाथ प्रधान यांनी ही जागा विकत घेऊन बाबांना अर्पण केली आहे. म्हणून या बागेस "साई प्रधान लेंडीबाग" असेही संबोधले जाते.

श्री साईबाबांचे मंदिर 200 स्क्वे.मी. पर्यंत पसरले आहे. या मंदिराचे स्थान हे शिर्डीच्या मध्यभागी आहे. भारतातून येणारे भक्तांचे हे मोठ्या तीर्थक्षेत्रातून एक तीर्थक्षेत्र मानले जाते.

दररोज येथे येणा-या भक्तांची संख्या जवळपास 25,000 पर्यंत असते. शिर्डीच्या यात्रेमध्ये दर्शन घेण्याकरिता येणा-या भक्तांची संख्या जवळपास दोन लाखापेक्षाही जास्त असते. या मंदिराचे नुतनिकरण, विस्तारीकरण व सुशोभिकरण इ.सन 1998-1999 मध्ये करण्यात आले आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या.

Other Temples अन्य मंदिरे : गणपती मंदिर, शनिमंदिर, शिवमंदिर

श्री साईबाबा समाधी मंदिराजवळच, उत्तरेच्या बाजूला कार्यालय इमारतीच्या आत गणपती मंदिर, शनी मंदिर व महादेव (शिव) मंदिर आहे. ही तीन मंदिरे शेजारी असून एकमेकांना जोडलेली आहेत. ही शिर्डी गावची ग्राममंदिरे होत. श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने या मंदिरांचे नुतनीकरण केलेले असून दैनंदिन देखभालही श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत केली जाते. शिमंदिरासमोर वाघाची मुर्ति प्रस्थापित केलेली आहे.

खंडोबा मंदिर

खंडोबाचे देवळापाशी । म्हाळसापतीचिया खळियाशी ।
आरंभी बाबा वऱ्हाडानिशी । उतरल्यादिवशी हे पडले॥

स.अ.5/26 श्रीसाईबाबा शिर्डीत प्रथम इ.स.1852 मध्ये प्रगट झाले असावेत, असे म्हटले जाते. त्यावेळी ते तेथे एक-दीड वर्षे होते. पण त्या काळात बाबांकडे कुणाचे लक्ष वेधलेले दिसत नाही. काही काळ ते शिर्डी सोडून गेले व इ.स. 1854 च्या आसपास औैरंगाबाद जिल्ह्यातील धुप गावच्या चांदभाई पाटलांच्या पत्नीच्या भाच्याच्या लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर त्यांचे शिरडीस पुनगरामन झाले. हे वऱ्हाड खंडोबाच्या देवळाजवळ गावाबाहेरील एका मळ्यात उतरले¸ व बाबा खंडोबाच्या देवळात गेले. श्री म्हाळसापती सोनार हे¸मंदिराचे पुजारी व मालक होते. खंडोबा हे त्यांचे कुलदैवत होते.

श्री बाबा प्रथम देवळांत गेले त्यावेळी कमरेला धोतर, अंगात कफनी व डोक्यावर टोपी असा त्यांचा वेष होता. त्यांना पाहताच म्हाळसापतींच्या मनात त्यांच्याविषयी प्रेमादराची भावना उत्पन्न होऊन 'आओ साईबाबा' ह्या शब्दात त्यांनी बाबांचे स्वागत केले. त्यावेळी बाबांचे वय फार तर 16-17 असावे.

हे खंडोबा मंदीर पूर्वाभिमुख असून दगडी बांधणीचे व औैरस चौैरस आकाराचे आहे. मंदिराचे गर्भागार 15'न्15' लांबी रुंदीचे असून, मध्यभागी श्री मार्तंड भैरवाची पाषाण मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या डाव्या हाताला बाणाबाईची व उजव्या हातास म्हाळसाबाईची मूर्ती असून, म्हाळसासमोर वाघ व बाणाबाईसमोर कुत्रा आहे. श्री मार्तंड भैरवाच्या पुढे खालच्या पायरीवर जमिनीपासून वितभर उंचीवर दोन शिवलिंगे¸ आहेत.

महालक्ष्मी मंदिर

शिर्डी पिंपळवाडी रस्त्यालगत, एम.टी.डी.सी. इमारतीजवळ हे ग्राममंदिर आहे. हे मंदिर द्वारकामाईपासून पाच मिनीटे चालण्याच्या अंतरावर आहे. श्री साईबाबा भिक्षा फेरीच्या वेळी कित्येकदा या मंदिरात येत असत. एकदा बाळा गणपत शिंपी नावाचे साईभक्त आजारी होते. अनेक उपाय करूनही त्यांना आराम पडला नाही. तेव्हा बाबा त्यांना म्हणाले, "महालक्ष्मी मंदिरासमोरील काळया कुत्र्याला दही भात खाऊ घाल." त्यांनी तसे केले असता त्यांना तात्काळ आराम पडला. श्री साईबाबा व्यवस्थेमार्फत या मंदिराचेही नुतनीकरण करण्यात आलेले आहे.

नरसिंह मंदिर

हे मंदिर बाबांच्या चावडीच्या पुर्वेला आहे. त्याजवळच श्री सखाराम शेळके यांचेही घर आहे. बाबा त्यांचेकडे भिक्षा मागण्यासाठी जात असत. श्री शेळके यंाच्या वंशजांनी सन 1960 साली हे मंदिर बांधलेले आहे.

जैन मंदिर

शिर्डीत दोन जैन मंदिरे बांधण्यात आलेली आहेत. पहिले जैन मंदिर नगर-मनमाड रस्त्यालगत श्री साई मंदिर परिसराच्या एक नंबरच्या महाद्वारासमोर रस्त्याच्या पश्चिमेस आहे. हे मंदिर 'श्री जैन श्वेतांबर तीर्थ ट्रस्ट' यांनी बांधलेले आहे. हे मंदिर बांधण्यात लोखंडाचा अजिबात वापर केलेला नाही, हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. मंदिरात अधेश्वर भगवानची मुर्ति आहे. दुसरे जैन मंदिर शिर्डी-कनकुरी¸ रस्त्यालगत नगरपंचायत कार्यालयापासून अर्धा किलोमिटर अंतरावर आहे. हे मंदिर 'श्री शांतीनिवास कमिटी' यांनी बांधलेले आहे. या मंदिराला आतून पूर्ण काचेचे आच्छादन जोडलेले असल्याने या मंदिरास काचमंदिर असेही म्हणतात. या मंदिरात सोळावे तिर्थंकर श्री शांतिनिवास यांची मुर्ति आहे.

विरभद्र मंदिर

हे मंदिर शिर्डीचे उपनगर बीरेगाव येथे आहे. हे अंतर शिर्डीपासून सुमारे दोन किलोमीटर आहे. विरभद्र शंकराचे गण/भैरव आहेत. दक्षचा पराभव करण्यासाठी शंकरांनी त्यांना आपल्या जटांतून निर्माण केले होते. विरभद्रांना शिर्डीचे ग्रामदैवत मानले जाते व दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला येथे जत्रा भरविली जाते. शिर्डीचे लोक नेहमी या मंदिरात दर्शनास येतात. या मंदिराचेही नुतनीकरण करून काचमंदिरात रुपांतर करण्यात आलेले आहे.

हनुमान / मंदिर

हनुमान मंदिर चावडी व द्वारकामाई यांच्या मध्ये गावाच्या वेशीच्या बाहेर आहे. हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे. या मंदिरात पुर्वी हनुमानच्या दोन मुर्ति होत्या. या मुर्ति श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने मंदिराच्या नुतनीकरणानंतर दुसरीकडे जतन करुन ठेवलेल्या आहेत.

श्री साईबाबांचा या मंदिराशी वेगळाच संबंध होता. पुष्कळ वेळा बाबा या मंदिरासमोर येऊन उभे राहत व ध्यानस्थ होऊन मंदिराकडे बघत राहायचे. या मंदिरात साधु व देविदास राहत असत. त्यांची व बाबांची नेहमी गाठभेट होत असे. तसेच दर गुरुवारी रात्री या मंदिरात भजन होत असे. आता दर शनिवारी मंदिरात भजन होते. कधी कधी बाबा मंदिरासमोर ऊभे राहून हात हालवीत असत. एकदा चावडी वरुन जुलुस चालला असताना मंदिरासमोर आल्यानंतर बाबाच्या शरीरात दैवी शक्तीचा संचार झाला व बाबा प्रभावित झाले. बाबा पूर्णपणे त्या शक्तीच्या अधिन झाले असे भक्तजनांना वाटले. आणि त्यांंनी बाबांना सांभाळून चावडीत आणले व नंतर ते शांत झाले. शामाने (साईभक्त श्री माधवराव देशपांडे) बाबांना याबाबत विचारले असता बाबा म्हणाले, "मी श्री हनुमानाचे अधिन होतो. हनुमान माझे भाऊ आहेत. ते ईश्वर चिंतनाचे वेगवेगळे संकेत देत होते."

आता या मंदिराचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेमार्फत नुतनीकरण करण्यात आलेले आहे. या मंदिराच्या दैनंदिन देखभालीचे कामही विश्वस्त व्यवस्थेमार्फतच बघितले जाते. पुर्वीच्या दोन मुर्तिंच्या ठिकाणी एक भव्य मुर्ति प्रतिष्ठीत केलेली असून त्यासमोर एक छोटी मुर्ति आहे. या छोटया मुर्तिच्या उपलब्धतेमुळे भक्तांना मारुतीस शेंदूर अर्पण करणे शक्य होते. मंदिरालगतच पिंपळ व निंब ही दोन वृक्ष असून त्यांच्या पाराचेही नुतनीकरण करण्यात आलेले आहे.

चार समाध्या

समाधी मंदिराच्या जवळच बाबांच्या काही निकटच्या भक्तांच्या समाध्या आहेत.

(लेंडी बागेच्या लगत पुढील बाजुला चार समाध्या आहेत.)

1) श्री भाऊमहाराज कुंभार

पहीली जी समाधी आहे ती भाऊमहाराज कुंभार यांची. ते मिति चैत्र वद्य 12 रोज बुधवार शके 1860¸ इंग्रजी दिनांक 20-4-1938 रोजी श्रीसाईचरणी विलीन झाले. ते बाबांचे परम व निष्ठावान भक्त होते. ते शिर्डीतील रस्ते, नाल्या दररोज साफ करत असत.

2) श्री नानावल्ली महाराज

दुसरी समाधी आहे ती श्री नानावल्ली महाराजांची ही खरोखरच एक वल्ली होती. कधी कधी ते बाबांना आपल्या आसनावरून उठवून त्या जागी स्वत: बसत असत. पण काही वेळाने त्यांना पुन्हा उठवून त्या जागेवर त्यांना बसवित व त्यांच्या चरणावर मस्तक ठेवीत. ते बाबांचे एक लाडके भक्त होते. श्री बाबांचे निर्वाण झाल्यावर बरोबर चौदा दिवसांनी म्हणजे 28 ऑक्टोबर 1918 रोजी ते वैकुंठवासी झाले.

3) श्री अब्दुल बाबा

तिसरी समाधी आहे ती श्री अब्दुल बाबांची. लहानपणी अब्दुल बाबा नांदेडच्या फकिराकडे शागीर्द होते. 1889 साली ते शिर्डीस आले व मशिदीत बाबांच्या समोर उभे राहताच. " मेरा कावला आया" या शब्दात बाबांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी अब्दुल बाबांचे वय 20 वर्षे होते. तेलाच्या पणत्या जागोजागी लावणे, मशिद दररोज झाडून साफ करणे, निंब वृक्षाच्या खालची जागा स्वच्छ करणे व तेथे पणती लावणे, बाबांचे कपडे धुणे, अशी अनेक कामे अब्दुल बाबा करीत असत. बाबांनी त्यांना कुराण शिकविले. इतर धामिर्क शिकवणही दिली.

4) श्री तात्या पाटील कोते

चौथी समाधी ही श्री तात्या पाटील कोते यांची आहे. बाबांचे हे एक परमभक्त होते. बाबा दरदिवशी त्यांना खर्चासाठी दररोज चार रूपये देत असत आपल्या अंतीम दिनीसुध्दा (15-10-1918) बाबांनी तात्यांना चार रूपये दिले. 1945 साली तात्या समाधिस्त झाले, त्यांची ही समाधी.